पराभवाच्या भीतीने भाजपची हातमिळवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:59 IST2021-03-05T00:59:13+5:302021-03-05T00:59:20+5:30
उल्हासनगर पालिका : सात विशेष समिती सभापतीपदे बिनविरोध

पराभवाच्या भीतीने भाजपची हातमिळवणी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना पराभवाच्या भीतीने भाजपने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ९ पैकी ७ समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होणे बाकी आहे. दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहेत.
विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आघाडीसोबत असल्याने भाजपची कोंडी झाली. समिती निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने शिवसेना आघाडीसोबत हातमिळवणी करून आरोग्य समिती व महिला व बालकल्याण अशा दोन समित्या पदरात पाडून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम समिती, नियोजन विकास समिती, महसूल समिती अशा तीन समित्या ओमी टीम समर्थक नगरसेवकांना, शिक्षण समिती शिवसेनेला तर गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला गेली आहे.
पुरस्वानींवर प्रश्नचिन्ह
महापालिकेसह विशेष समितीमध्ये स्पष्ट बहुमत असताना विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीत माघार का, असा प्रश्न पक्षातून विचारला जात आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यानंतर पक्षाचे बहुमत असताना पराभवाचे धक्के बसत आहेत.