सेनेचा भाजपाला दे धक्का?

By Admin | Updated: January 30, 2017 02:02 IST2017-01-30T02:02:48+5:302017-01-30T02:02:48+5:30

भाजपाशी यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आणि मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेला टाळी देण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद कल्याण

BJP to push the army? | सेनेचा भाजपाला दे धक्का?

सेनेचा भाजपाला दे धक्का?

प्रशांत माने, कल्याण
भाजपाशी यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आणि मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेला टाळी देण्याची तयारी सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही उमटू लागले आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देऊन औकात दाखवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच, अचानकपणे मनसेतील हालचालींनाही वेग आला असून बदलत्या समीकरणांबाबत पक्षात खलबते सुरू आहेत. त्यामुळे सव्वा वर्षासाठी हे पद मनसेलाही दिले जाऊ शकते, असे संकेत देण्यास शिवसेनेच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे.
पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्याची अंमलबजावणी करू, असे सांगत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळले; तर भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी केडीएमसीतील युती कायम राहील. युती तोडण्याचा निर्णय पुढील निवडणुकीसाठी असल्याचे सांगितले.
शिवसेना आणि भाजपामधील संबंध विकोपाला गेले आहेत. मुंबईतील सभांमध्ये औकात दाखवण्यापासून पाणी पाजण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत संतापाची भावना आहे.
कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी परस्परांवर चिखलफेक करत उणीदुणी काढली होती. या लढाईत भाजपाच्या जागा वाढल्या खऱ्या, पण शिवसेनेची सत्ता उलथणे, त्यांना शक्य झाले नाही. शिवसेनेलाही बहुमत सिद्ध करण्यासाठी संख्याबळ अपुरे पडल्याने नाइलाजास्तव भाजपाच्या गळ्यात गळे घालून पुन्हा युती करणे भाग पडले. सत्तेतील ही युती केवळ नावाला असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत असून महासभेच्या वेळी या दोन्ही पक्षांमधील मतभेद आणि त्यातून उद्भवणारे तंटे पाहता बहुतांश वेळा भाजपा या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकदा तरी भाजपाला धडा शिकवावा, अशी येथील शिवसैनिकांची भावना आहे. त्यासाठी उपमहापौरपदाच्या निवडणुकीची संधी आयती चालून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

भाजपाचे उपमहापौर विक्रम तरे यांनी वर्षाचा कालावधी संपल्याने पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या गटनेत्यांकडून तो राजीनामा महापौर राजेंद्र देवळेकरांकडे देण्यात आला. तो त्यांनी मंजूर केला. त्यामुळे लवकरच या रिक्त पदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. ती फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्यासाठी महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येथे युती कायम ठेवली, तर १० पालिकांच्या निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती तोडावी आणि जे पक्ष सहकार्य करतील, त्यांना संधी द्यावी, असा मतप्रवाह पक्षात आहे.

मनसेचा पाठिंबा?
सद्य:स्थितीत १२२ जागांपैकी नऊ अपक्षांच्या सहकार्याने शिवसेना ५७, भाजपा ४७, मनसे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, बसपा १ आणि एमआयएम १ असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ६३ संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे मनसेने पाठिंबा दिला, तर शिवसेना उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: BJP to push the army?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.