‘...तर पवारांनाही दिल्लीत फडणवीस घेऊन जातील’; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 06:38 IST2022-08-07T06:38:15+5:302022-08-07T06:38:22+5:30
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कळवा येथील पत्रकार परिषदेत लगावला.

‘...तर पवारांनाही दिल्लीत फडणवीस घेऊन जातील’; चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?, पाहा
ठाणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतेही ठोस असे मुद्दे नाहीत. त्यामुळेच ते मंत्रिमंडळ विस्तार या एकमेव मुद्द्यावर बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विकासकामांसंदर्भात दिल्लीला जात असतात. पवार यांनाही दिल्लीत जायची इच्छा असेल तर त्यांनी तसे शिंदे आणि फडणवीस यांना सांगावे म्हणजे ते त्यांनाही बरोबर घेऊन जातील, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कळवा येथील पत्रकार परिषदेत लगावला.
महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच काम केले नाही. त्यांच्यापेक्षा चारपट चांगले काम शिंदे आणि फडणवीस पुढील अडीच वर्षांत करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना जे जमले नाही ते काम शिंदे-फडणवीस जोडी करून दाखवेल, असे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या काळात विकास कामे केली; परंतु मागील अडीच वर्षांत राज्यातील विकास थांबला होता. तो विकास करण्याचे काम शिंदे-फडणवीस करीत आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
विरोधी पक्षाकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे नसल्याने ते केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर जातात. आजही ते नीती आयोगाच्या बैठकीसाठी गेले आहेत. पवार यांनाही दिल्लीवारी करायची इच्छा असल्यास त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना तसे सांगावे म्हणजे त्यांनाही ते बरोबर घेऊन जातील, असेही ते म्हणाले.