ठाणे: एकीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे या दोन पक्षांमधला संघर्ष ठाण्यातल्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. रस्त्यांमधल्या खड्ड्यांवरुन भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधत निवडणुकीआधी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शहरातल्या खड्ड्यांवरुन भाजपानं आरजे मलिष्काच्या गाण्याचा आधार घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आज भाजपानं ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. मुंबईकर तुला बीएमसीवर भरवसा नाय का, असा सवाल उपस्थित करणाऱ्या आरजे मलिष्काच्या गाण्याचा आधार घेत भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं. 'ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल, अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांचे झोल झोल.. ठाणेकर तुला प्रशासनावर भरवसा नाय का?', असं म्हणत भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्यांवरुन शिवसेनेची खिल्ली उडवली. यावेळी ठाणे मनपातील भाजपाचे गटनेते नारायण पवारदेखील उपस्थित होते. यंदाच्या पावसात ठाण्यातल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सोशल मीडियावरुन ठाणेकरांनी पालिकेच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला आहे. आता याच खड्ड्यांवरुन भाजपानं शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. विशेष म्हणजे एका बाजूला शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला या दोन्ही पक्षांमधील 'विळ्या-भोपळ्याचं' नातं अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल; भाजपानं शिवसेनेला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:53 IST