युतीच्या जागावाटपातून भाजपाला डावलले

By Admin | Updated: October 12, 2016 04:40 IST2016-10-12T04:40:34+5:302016-10-12T04:40:34+5:30

भाजपाने ओमी टीमला प्रवेश देत शिवसेनेला धक्का देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात नेल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरून

The BJP got the seat from the seat of the alliance | युतीच्या जागावाटपातून भाजपाला डावलले

युतीच्या जागावाटपातून भाजपाला डावलले

उल्हासनगर : भाजपाने ओमी टीमला प्रवेश देत शिवसेनेला धक्का देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात नेल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरून स्वतंत्र युतीच्या जागावाटपासाठी बुधवारी गुप्त बैठक बोलावली आहे. युती तुटल्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेनेने या बैठकीचे आमंत्रण भाजपाला दिलेले नाही.
त्याचवेळी भाजपाच्या नेत्यांनीही शिवसेनेशी युतीबाबत पक्षानेही कोणताच आदेश दिलेला नाही, असे सांगत बैठकीबाबत कानावर हात ठेवले. भाजपाच्या कोट्यातून केंद्रात मंत्रिपद मिळवल्यानंतर शिवसेनेशी चर्चा करत असल्याबाबत विचारता रिपब्लिकन नेत्यांनी ही स्थानिक चर्चा असल्याचे सांगितले आणि आठवले देतील तो निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना-रिपाइं नेत्यांच्या तोरणा विश्रामगृहावर होणाऱ्या बैठकीत पालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होणार असून खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, चंद्रकांत बोडारे, शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइंचे नेते बी. बी. मोरे, शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, नाना बागुल, अरूण कांबळे आदी नेते बैठकीला उपस्थित राहतील.
भाजपाकडून विश्वासघात -
महायुतीतील शिवसेना आणि रिपाइंना विश्वासात न घेता भाजपाने ओमी कलानी टीमसोबत निवडणुकीची बोलणी आणि प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. ओमी टीमला प्रवेश दिल्यास युती तोडण्याचे स्पष्ट संकेत आम्ही भाजपाला दिले आहेत. त्यामुळेच बुधवारच्या बैठकीतून भाजपाला डावलण्यात आले असून शिवसेना व रिपाइं यांच्यातच निवडणुकीविषयाची बैठक तोरणा विश्रामगृहावर होणार आहे. - राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख.
युतीबाबत आदेश नाही!-
शिवसेना-भाजपा आणि रिपाइं युतीबाबत पक्षाचा कोणताच आदेश नाही. त्यामुळे युतीबाबतची चर्चा निष्फळ आहे. पक्ष आदेशानंतर मित्रपक्ष रिपाइंसह शिवसेनेशी निवडणुकीबाबत बोलणी करू. त्यापूर्वी तोरणावर होणाऱ्या बैठकीला जाण्यात अर्थ नाही. पक्ष वाढविण्यासाठी आम्ही मंगळवारी साई व मनसेचे नगरसेवक जयश्री पाटील व रवींद्र दवणे यांना पक्षात प्रवेश दिला आहे.
- कुमार आयलानी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष.
ताकद दाखवण्यासाठी चर्चा-
महापालिका निवडणुकीत रिपाइंची ताकद वाढविण्यासाठी स्थानिक नेत्यांना दिलेल्या अधिकारानुसारच शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू आहे. पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचा आदेश अंतिम असून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. आहे. मात्र तेही स्थानिक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतील, असा विश्वास आहे.
- भगवान भालेराव, रिपाइं शहर जिल्हाध्यक्ष.

Web Title: The BJP got the seat from the seat of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.