लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलो. पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री राहिलेला नाही आणि भविष्यात राहणार की नाही मला शंका आहे, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी केले. मानकोली येथील क्रीडांगणावर आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील चषक या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाईक बोलत होते.
नाईक म्हणाले की, पालघरमध्ये, त्यानंतर नवी मुंबई व ठाणे येथे जनता दरबार पार पडले. आता पुढची तारीख मी जाहीर केली. एकेका तालुक्यात मी जनता दरबार घेत फिरणार आहे. भिवंडीसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, जव्हार, मोखाडा या सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे. ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांच्यावर फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि त्यांच्या अंगी विनयशीलता असावी लागते. ती आमच्यामध्ये आहे, असा टोला नाईक यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला.
कार्यक्रमास प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील उपस्थित होते. कोनगाव येथील शिव चरोबा सामाजिक संघटनेचे राजू हेंदर म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पक्ष भिवंडी तालुका यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे.