बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट; रिऍक्टर आणि रिसिव्हरच्या स्फोटामुळे संपूर्ण कंपनी बेचिराख

By पंकज पाटील | Updated: August 5, 2024 11:35 IST2024-08-05T11:34:56+5:302024-08-05T11:35:13+5:30

रिसिव्हर उडून ४०० मीटर अंतरावरील चाळीवर पडला.

Big explosion in chemical company in Badlapur; Reactor and receiver explosions cripple the entire company | बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट; रिऍक्टर आणि रिसिव्हरच्या स्फोटामुळे संपूर्ण कंपनी बेचिराख

बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट; रिऍक्टर आणि रिसिव्हरच्या स्फोटामुळे संपूर्ण कंपनी बेचिराख

बदलापूर : बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला असून यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही.

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं. आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कंपनीत रिऍक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली.

हा स्फोट इतका भीषण होता की रिऍक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय, तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.

Web Title: Big explosion in chemical company in Badlapur; Reactor and receiver explosions cripple the entire company