ठाकरे गटाला मोठा धक्का! मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 22:21 IST2025-01-27T22:19:01+5:302025-01-27T22:21:12+5:30
Thackeray Group Vs Shinde Group: वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या सर्वांचा पक्षप्रवेश झाला, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाकरे गटाला मोठा धक्का! मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत
Thackeray Group Vs Shinde Group: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, असा कयास आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे सूतोवाच केले आहे. स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु, राज्यातील अन्य निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याचा विचार ठाकरे गटाचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून, पक्षातील गळती सातत्याने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील धुसपूस सातत्याने समोर येत आहे. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याबाबत ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच अनेक वर्ष सोबत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत साथ सोडून चालले आहेत. सोडून जात असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांबाबत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भूमिका स्पष्ट असून, ते कोणालाही थांबवण्याच्या मानसिकतेत नाहीत. तर दुसरीकडे ऑपरेशन धनुष्यबाण, ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे खासदार, आमदार शिवसेना शिंदे गटात येणार असल्याचे दावे केले जात आहे. ठाकरे गटातील अंतर्गत धुसपूस, पक्षाला लागलेली गळती आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रवेश यावरून महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचा चांगलाच कस लागणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत
मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळावर हा पक्षप्रवेश संपन्न झाला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करून दिली.
- राजूल पटेल यांच्यासह विले पार्ले येथील शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोद धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
- नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या इंदूबाई सुदाम नागरे, माजी नगरसेवक विक्रम नागरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सचिव समिना शोएब मेनन यांचा पक्षप्रवेश झाला. त्यासोबतच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, ठाकरे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेते प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.