भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट; मनपा, वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:05 IST2023-04-11T20:04:10+5:302023-04-11T20:05:14+5:30
कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

फोटो - नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी शहरात महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिस यांच्या मधील समन्वयाअभावी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना या वाहतूक कोंडीचे नियोजन करायचे कोणी, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.
शहरात वाहन स्थळांचे योग्य नियोजन कुठेच केले नसल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय, भिवंडी न्यायालय, पोलीस उपायुक्त कार्यालय,तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती,स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालय,तिन्ही नोंदणी रजिष्टार कार्यालय व महानगरपालिका या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी दररोज शेकडो चार चाकी व त्याहून अधिक पटीने दुचाकी वाहन भिवंडी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून येत असतात. वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांसमोर आपली वाहन नक्की उभी करायची कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे.त्यातच रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना टोईंग व्हॅन वाले उचलून नेत असल्याने नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.टोविंग व्हॅनच्या कारवाईने नागरिक धास्तावले आहेत.
वाहतूक कोंडीतून नागरिकांचे सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभारली आहे मात्र ही सिग्नल यंत्रणा सध्या बंद आहे, त्यामुळे सिग्नल यंत्रणेवर महापालिकेने केलेला लाखोंचा खर्च वाया गेला असून वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे अशीच राहिली आहे.शहरात वाहतूक कोंडीच्या संकटाला समस्त नागरिकांना ,शाळकरी विद्यार्थी चाकरमानी यांना सामोरे जावे लागत आहे.