भिवंडीतील गोदामास लागलेल्या भीषण आगीत मायलेकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
By नितीन पंडित | Updated: November 7, 2023 22:49 IST2023-11-07T22:49:11+5:302023-11-07T22:49:20+5:30
कंपनीत शॉर्ट सर्किटने आग लागल्या नंतर या आगीची माहिती मिळताच कंपनी मध्ये काम करणारे महिला व पुरुष कामगार कंपनी मधून बाहेर पळाले.

भिवंडीतील गोदामास लागलेल्या भीषण आगीत मायलेकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
भिवंडी: तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथील पहिल्या मजल्यावरील टेक्सराईज कापसापासून उशा बनवणाऱ्या शेजल इंटरप्रयझेस या कंपनीस मंगळवारी सायंकाळी उशिराच्यासुमारास शॉर्ट सर्किटने आग लागण्याची दुर्घटना घडली आहे.या आगीत काम करणारी महिला व तिच्या सोबत आलेला तीन वर्षीय चिमुकला होरपळून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.शकुंतला रवी राजभर वय ३५ वर्ष व प्रिन्स राजभर वय ३ वर्ष असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत.
कंपनीत शॉर्ट सर्किटने आग लागल्या नंतर या आगीची माहिती मिळताच कंपनी मध्ये काम करणारे महिला व पुरुष कामगार कंपनी मधून बाहेर पळाले.त्यामध्ये शकुंतला ही सुध्दा होती. परंतु ती बाहेर पडल्यावर तिच्या सोबत आलेला तिचा लहान तीन वर्षांचा प्रिन्स नावाचा मुलगा आत मध्ये राहिल्याचे लक्षात आल्यावर शकुंतलादेवी पुन्हा आत मध्ये मुलाला वाचविण्यासाठी गेली होती.मात्र भीषण आगीत मुलासह तीही होरपळून मृत्युमुखी पडली.
घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते मते त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने आग विझविण्यात अडचण येत होती अखेर खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी छता वरील स्लॅब तोडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असतांना गोदामाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाथरूम जवळ दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाला आढळून आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिस व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत.