भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे भर पावसात डफली बजाओ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:07 IST2020-08-12T17:06:32+5:302020-08-12T17:07:12+5:30
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील त्वरित सुरु करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे भर पावसात डफली बजाओ आंदोलन
भिवंडी : कोरोना काळात बंद केलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख बस वाहतूक तात्काळ सुरू करावी , लॉकडाऊन हटविण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते डफली वाजवून सरकारचा निषेध करीत असताना भिवंडी शहरात जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एसटी स्थानकात भर पावसात एकत्रित होत डफली वाजवून सरकारचा निषेध केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशासह राज्यात प्रचंड बेरोजगारी व आर्थिक मंडी निर्माण झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन आणखी शिथिल करून सुरक्षिततेचे उपाययोजना करून सर्व आर्थिक व्यवहार सुरु करण्याची मागणी यावेळी वंचितने आपल्या डफली बजाओ आंदोलन प्रसंगी केली. त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील त्वरित सुरु करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बुद्धेश जाधव, बालाजी कांबळे, गुणवंत शिंदे, अंकुश बचुटे, बादल सय्यद, प्रल्हाद गायकवाड, मीरा मते, रमेश अडागले आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर बस आगार व्यवस्थापक एस पी डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना बस सेवा तात्काळ सुरू करावी अशा मागण्यांचे लेखी निवेदन देखील याप्रसंगी देण्यात आले.