भिवंडी : आर्थिक तंगी, व्यवसायातील मंदी, पतीचे आजारपण व मुलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने महिलेची ८ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना भिवंडीत घडली असून, याप्रकरणी महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली असून, त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या घटनेबद्दल माहिती दिली.
नुसरा अख्तर अलीम अन्सारी (वय ४६ वर्षे, रा.मिल्लतनगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून, हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे.
भोंदू बाबा दुकानात ग्राहक म्हणून आला अन्...
आरोपी भोंदूबाबा महिलेच्या दुकानात ऑक्टोंबर २०२३ मध्ये ग्राहक म्हणून आला. त्यावेळी भोंदू बाबाने महिलेल्या पतीला सांगितले की, तुमच्यावर व मुलावर काळी जादू झाली असून, मुलावरील काळी जादू न उतरवल्यास सहा महिन्यात तो जीव गमावून बसेल. भोंदू बाबाने भीती दाखवली. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर घरात केलेल्या पुजेदरम्यान अंड्यामधून खिळा काढून दाखवला होता.
आठ लाखात मृतदेहाचा ठरला सौदा
यानंतर काळ्या जादूसाठी मृतदेहाची गरज असून, चांदवड (मालेगाव) येथे मृतदेह मिळणार असल्याचे सांगत पीडित कुटुंबीयांना बाबा चांदवड मालेगाव येथे घेऊन गेला. तेथील एका बाबाच्या साथीदाराने दहा लाख रुपयांत मृतदेह मिळेल असे सांगितल्यानंतर भोंदू बाबाने आठ लाख रुपयांत सौदा केला.
त्यांनतर महिलेचा विश्वास बसावा म्हणून एका मृतदेहाचा फोटो मोबाईलवर पाठवला. महिलेकडे पैसे नसल्याने याच भोंदू बाबाने या पीडित कुटुंबीयाला खासगी सावकाराकडून महिना नऊ टक्के व्याजाने तीन लाख रुपये कर्जाने पैसे मिळवून दिले.
त्यानंतर भोंदू बाबाने कोणतेही काम न करता फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने पीडित महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्ष वंदना शिंदे यांच्याकडे पीडित महिलेने आपली कैफियत मांडली.
त्यांनी सदरची घटना पोलीस आयुक्तांना सांगताच पोलीस प्रशासनाची चक्रे वेगाने फिरली. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात हजरत बाबा उर्फ अमजद असद खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.