भिवंडीत बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांबरोबरच कचऱ्याचेही विघ्न
By नितीन पंडित | Updated: September 18, 2023 16:10 IST2023-09-18T16:09:02+5:302023-09-18T16:10:22+5:30
गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.

भिवंडीत बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांबरोबरच कचऱ्याचेही विघ्न
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: मंगळवारी गणेशाचे आगमन होत असून गणपती बाप्पांच्या आगमनासाठी इतर शहरांमध्ये रस्त्यावरील खड्डे व स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जात असतानाच भिवंडीत मात्र रस्त्यावरील खड्डे व कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे यंदा शहरातील बाप्पांच्या अगमानात रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच कचऱ्याचेही विघ्न आले आहे.शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून मुख्य रस्त्यांवर देखील कचऱ्याचे ढिग साचले आहेत.मात्र त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.
भिवंडी मनपाने शहरातील कचरा उचलण्यासाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे.या ठेकेदारावर महिन्याला सुमारे दोन कोटींची उधळण प्रशासन करत आहे.मात्र सध्या ठेकेदाराचे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात कचरा समस्यां गंभीर बनली आहे. भिवंडीतील निजामपुरा,गैबी नगर,शांतीनगर,बाबला कंपाउंड,नवी वस्ती,कामतघर आदी भागात कचऱ्याचे ढिग ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.तर भिवंडी कल्याण या मुख्य रस्त्यावर नवी वस्ती येथील वेलकम हॉटेलसमोर कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत.मंगळवारी गणेशोत्सव असल्याने याच मार्गावरून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पांना घेऊन जात आहेत.मात्र रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रस्त्यांसह परिसरात दुर्गंधी पसरत असून या दुर्गंधी रस्त्यावरूनच बाप्पांचे आगमन होत आहे.विशेष म्हणजे या साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूलाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप असून या कचऱ्याच्या ढिगांमुळे गणेशभक्तांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.