- सदानंद नाईक उल्हासनगर - छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त एसएसटी महाविद्यालयात कवितेतला भीमराव या कार्यक्रमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विविध पैलू सुप्रसिद्ध कविनी आपल्या कवितातून सादर केले. यावेळी ख्वाडा चित्रपटाचे गीतकार डॉ विनायक पवार यांनी घटना माझी गीता, घटना माझे कुराण ही कविता सादर करून सर्वांची दाद मिळविली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, एसएसटी महाविद्यालयात कवितेतला भीमराव या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सायंकाळी केले होते. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. सी. पुरुस्वामी यांनी करून दिप प्रज्वलन सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या हस्ते झाले. तसेच बोधिवृक्षाला जलार्पण ऍड. दिलीप वाळंज, माजी नगरसेवक नाना पवार, प्रमोद टाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ख्वाडा चित्रपटाचे गीतकार डॉ विनायक पवार यांनी घटना माझी गीता, घटना माझी कुराण ही कविता सादर करून सर्वांची दाद मिळविली. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी ये भीमराया, भारतरत्ना जन्म पुन्हा तू घे, पुतळ्या मधून खरेच आता बाहेर तू ये , ही कविता सादर केली. तर जितेंद्र लाड यांनी नवा उजेड होऊन भीम जागला रातीला हे गाणे सादर केले. आय. एम. मोरे यांनी वामनदादा कर्डक यांचे फुल होऊन पडावे भीमाचे गळी हे गीत सादर केले.
काव्य मैफिलीत भरत अंबावणे, श्रीकांत बागुल, डॉ नरसिंग इंगळे, ऐश्वर्या पवार, किरण भिलारे, सोनाली जाधव, सचिन सरदार, राज असरोंडकर, मंगेश सरदार, वैशाली पगारे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित गिते सादर केली. डॉ सुवर्णा अहिरे यांनी प्रास्तविक केले, वृषाली विनायक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ दिपक गावंडे यांनी आभार प्रदर्शन केले.