ठाण्यात मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:29 IST2018-10-23T21:26:05+5:302018-10-23T21:29:45+5:30
महाविद्यालयातील मैत्रिणीशी जवळीक साधल्यानंतर ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावरच लैंगिक अत्याचार करणा-या प्रथमेश बाबर याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठाण्यात मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
ठाणे : महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणा-या प्रथमेश महादेव बाबर (१९, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित तरुणी १८ वर्षांची असून ती आणि आरोपी प्रथमेश हे दोघेही ठाण्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. ती घोडबंदर रोड भागात तर तो मानपाड्यातील शिवाजीनगर भागात वास्तव्याला आहे. दोघांमध्येही चांगली मैत्री आहे. तिचा फायदा घेऊन जुलै २०१८ ते ६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. घरातील मंडळी बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरी वेगवेगळ्या बहाण्याने यायचा. त्याचवेळी त्याने हे कृत्य केले. आईवडिल रागावतील म्हणून तिने घरातही हा प्रकार सांगितला नाही. मात्र, आठवड्यापूर्वी तिला पोटात त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यावेळी आपल्याच मित्राने अत्याचार केल्याची माहिती तिने कुटूंबियांना दिली. तिच्या पालकांनी आणि तिने याप्रकरणी २२ आॅक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने त्याला अटक केली.