मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेने रस्त्यांवरचे खड्डे बुजवले नाही. जे बुजवले तिथे पुन्हा खड्डे पडल्याने महापालिकेच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने बुधवारी भीक मागा आंदोलन केले.
महापालिका प्रशासन व महापौरांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरले जातील, अशी वक्तव्ये केली होती. परंतु गणरायाचे आगमन व विसर्जन खड्ड्यांतूनच भाविकांना करावे लागले. प्रहार जनशक्ती पक्षाने खड्डे भरावे म्हणून पालिकेस पत्र दिले होते. त्यावेळी पालिका आयुक्तांनी आश्वासन दिले होते. तरीदेखील महानगरपालिकेने खड्डे भरले नाहीत. काही ठिकाणी डेब्रिस टाकले गेले, तर काही ठिकाणी पॅचवर्कच्या नावाखाली खड्ड्यांच्या आकारापेक्षा अवास्तव प्रमाणात पॅचवर्क करून पैसे लाटण्याचा उपद्व्याप केला. अनेक ठिकाणी पॅचवर्क निघून पुन्हा खड्डे पडल्याचा आरोप प्रहारचे शहर अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी केला आहे.
त्यामुळे प्रहारने काशिमीरा चेक नाका वाहतूक पोलीस चौकीजवळ भीक मागा आंदोलन केले. यावेळी निकमसह काशिनाथ केंद्रे, नागेश चव्हाण, संतोष म्हात्रे, नवनाथ आढळे, वासुदेव पाटीदार, करण गवले, अविनाश म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खड्डे बुजवण्यासाठी यावेळी भीक गोळा करण्यात आली.