उल्हासनगरमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण, मोटरसायकलचे नुकसान
By सदानंद नाईक | Updated: October 3, 2023 16:44 IST2023-10-03T16:43:42+5:302023-10-03T16:44:47+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विजय गणेश लुल्ला हे सोमवारी रात्री १० वाजता कारखान्यातून घरी जात होते.

उल्हासनगरमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण, मोटरसायकलचे नुकसान
उल्हासनगर - जुन्या रागातून विजय लुल्ला या इसमाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली. तसेच मोटरसायकलची नुकसान केल्या प्रकरणी धीरज रोहरा याच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मारहाणीचा प्रकार सोमवारी रात्री १० वाजता घडला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विजय गणेश लुल्ला हे सोमवारी रात्री १० वाजता कारखान्यातून घरी जात होते. यावेळी ढोलुराम दरबार ठिकाणी पाठीमागून आलेल्या धीरज उर्फ धीरू हरेशलाल रोहरा याने जुन्या रागातून विजय लुल्ला यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बेदम मारहाण केली. तसेच मोटरसायकलची तोडफोड केली.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धीरज विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. धीरज रोहरा याने ७ ते ८ वर्षांपूर्वी एका मुलीला छेडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला मारहाण केली होती. या हाणामारीत विजय लुल्ला हाही सहभागी असल्याच्या रागातून मारहाण केल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.