दुर्गाडी खाडीपुलाच्या ऑनलाइन लोकार्पणाआधी रंगली श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:24+5:302021-06-01T04:30:24+5:30
कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या ...

दुर्गाडी खाडीपुलाच्या ऑनलाइन लोकार्पणाआधी रंगली श्रेयवादाची लढाई
कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या आधीच पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना, भाजप आणि मनसेत लढाई रंगली होती. त्यामुळे लोकार्पणस्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.
कार्यक्रमस्थळी मनसेचे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजता पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना काय काम आहे अशी विचारणा करून पिटाळून लावले. पोलिसांना कुणकुण लागली की, मनसे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार करू शकते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगितले की, या ठिकाणी फालतुगिरी करू नका, अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील, असा दम भरल्यावर ते त्या ठिकाणाहून निघून गेले. थोड्या वेळानंतर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर तेथे आले. त्यांनी आम्ही आंदोलन करणार नाही की, काळे झेंडे दाखविणार नाही. पुलाचे लोकार्पण होत असल्याने आनंद आहे. मात्र, या कामाकरिता मी स्वत: पाठपुरावा केला आहे. कामाची पाहणी करू द्या. त्यावेळी पोलिसांनी केवळ भोईरच पाहणी करतील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते जाणार नाही, असे सांगितल्याने पोलिसांसोबत भोईर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेकडून त्यांना कार्यक्रमास बोलाविले गेले नसल्याचे सांगितले.
भोईर यांच्या या वक्तव्यावर शिवसेननेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे याचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माजी आमदारांना निमंत्रण दिले गेले नाही हा आमचा विषय नाही. हा कार्यक्रम एमएमआरडीएने आयोजित केला असल्याने त्यांनी त्यांना जाब विचारावा.
दरम्यान, एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, माझ्या खासदारकीच्या निवडणुकीच्या सभेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना या पुलाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पूल वेळेत पूर्ण झाला नाही. अन्यथा, या पुलाचे काम फडणवीस यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले असते. त्यामुळे श्रेय कोणीही घेऊ द्या हे काम भाजप सरकारच्या कारकिर्दीत झाले आहे.
------------------------