पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:54 IST2025-11-05T08:52:54+5:302025-11-05T08:54:22+5:30
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि जव्हार या तीन नगर परिषदांसह चार नगरपंचायतींपैकी वाडा नगरपंचायतीमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे.

पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि जव्हार या तीन नगर परिषदांसह चार नगरपंचायतींपैकी वाडा नगरपंचायतीमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील वाडा, तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड नगरपंचायतींपैकी तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड या तीन नगरपंचायतींची मुदत अजून संपलेली नसल्याने वाडा या एकमेव नगरपंचायतीमध्ये आणि पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. पालघर नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. थेट निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे विराजमान झाल्या होत्या. या नगरपरिषदेत एकूण २८ जागा होत्या, त्यापैकी शिवसेना १४, भाजप ६, राष्ट्रवादी ३ आणि अपक्ष ५ असे बलाबल होते. शिवसेनेच्या फुटीनंतर सध्या शिंदेसेना-भाजप महायुतीची सत्ता होती.
जव्हार नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल हे निवडून आले होते. एकूण १६ जागांपैकी शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, भाजप एक, अपक्ष एक असे एकूण बलाबल होते. डहाणू नगरपरिषदेवर भाजपची सत्ता असून, भाजपचे भरत राजपूत हे थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. या नगर परिषदेत एकूण २५ जागा असून, भाजपा १५, शिवसेना २, राष्ट्रवादी ८ असे बलाबल होते. जिल्ह्यातील वाडा, तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड या चार नगरपंचायतींपैकी वाडा पंचायतीचा कालावधी संपल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.