मोटारीच्या अंत्ययात्रेला बंदी
By Admin | Updated: November 9, 2016 03:49 IST2016-11-09T03:49:27+5:302016-11-09T03:49:27+5:30
मोटार खरेदी करणे हे बहुतांश मध्यमवर्गीयांचे स्वप्न असते. खंबाळपाडा येथील रहिवासी राजेश सिंह यांनीही हौसेपोटी मोटार खरेदी केली होती.

मोटारीच्या अंत्ययात्रेला बंदी
डोंबिवली : मोटार खरेदी करणे हे बहुतांश मध्यमवर्गीयांचे स्वप्न असते. खंबाळपाडा येथील रहिवासी राजेश सिंह यांनीही हौसेपोटी मोटार खरेदी केली होती. मात्र ती सातत्याने नादुरुस्त झाली. आता जर्जरावस्थेतील त्या मोटारीची अंत्ययात्रा काढण्याकरिता परवानगी देण्याची मागणी सिंह यांनी केली असून पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली आहे. सिंह यांनी भंगलेल्या स्वप्नाची ही करुण कहाणी चक्क फ्लेक्स लावून जगजाहीर केल्याने या मृत मोटारीची व तिच्या न निघालेल्या अंत्ययात्रेची सर्वदूर चर्चा सुरु आहे.
सिंह यांनी २००५ साली टाटा इंडिका ही मोटार खरेदी केली. खरेदीपासून सिंह यांची मोटार नादुरुस्त होती, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी मोटार कंपनीकडे सातत्याने तक्रारी केल्या. सिंह यांच्या तक्रारीची दखल घेत कंपनीने मोटारीतील त्रुटींविषयी लिहून दिले. मोटार दीर्घकाळ न चालवल्याने तिचा खालचा पत्रा गंजला. परिणामी ती चालवण्याच्या स्थितीत राहिली नाही. सिंहने पुन्हा कंपनीशी संपर्क साधला. मोटारीच्या दुरुस्तीवर किमान ८४ हजार रुपये खर्च करावे लागतील, असे कंपनीने स्पष्ट केले. मोटार दुरुस्तीवर ८४ हजार रुपयेच काय एक लाख रुपये खर्च करण्यासही आपण तयार आहोत पण दुरुस्तीनंतर मोटार किती काळ चालेल याची हमी देण्याची मागणी केली. त्याला कंपनीने नकार दिला. या वादात जर्जर झालेल्या मोटारीची सिंह यांना अंत्ययात्रा काढायची आहे. मोटारीची अंत्ययात्रा काढण्याकरिता परवानगी घेण्यास सिंह मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी दिलेला अर्ज पाहून पोलिसही चक्रावून गेले. मोटारीची अंत्ययात्रा काढण्यास परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. मोटारीची अंत्ययात्रा काढल्यास कारवाई करण्याची नोटीस पोलिसांनी सिंह यांना बजावली आहे. (प्रतिनिधी)