बँकेला ११ लाखांना गंडा, भामट्यासह दोघा सराफांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST2021-09-17T04:48:30+5:302021-09-17T04:48:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला ११ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यासह ते दागिने खरे ...

Bank charges Rs 11 lakh against two bullion dealers | बँकेला ११ लाखांना गंडा, भामट्यासह दोघा सराफांविरोधात गुन्हा

बँकेला ११ लाखांना गंडा, भामट्यासह दोघा सराफांविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला ११ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यासह ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या बँकेच्या दोघा सराफांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट भागातील कॅनरा बँक शाखेतून रामकुमार राजाराम तिवारी (५९, रा. ओस्तवाल शॉपिंग सेंटर, जेसल पार्क) याने जुलै ते ऑगस्टदरम्यान थोडे थोडे करून चार वेळा बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ११ लाख दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले. दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले नवघर मार्गावरील सराफ सुरभी ज्वेलर्सचे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले.

बँकेच्या नियमानुसार दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर बँकेच्या मुख्य शाखेमार्फत तारण सोन्याची तपासणी केली जाते. राज आर्ट ज्वेलर्सचे मालक अरुण सोनी यांनीदेखील दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

दरम्यान, कॅनरा बँकेच्या गोडदेव शाखेत ७ सप्टेंबरला तिवारी हा दागिने घेऊन कर्जासाठी गेला असता व्यवस्थापक सौरभ गुप्ता यांना संशय आला. संगणकावर तपासणी केली असता तिवारी याने त्याच बँकेच्या न्यू गोल्डन नेस्ट शाखेतून चारवेळा सोने तारण कर्ज घेतल्याचे आढळले. त्याबाबत विचारणा करताच तिवारी दागिने घेऊन निघून गेला.

संशय बळावल्याने गुप्ता यांनी न्यू गोल्डन नेस्ट शाखेचे व्यवस्थापक प्रभाकर साह यांना कळवले. तिवारीने गहाण ठेवलेल्या दागिन्यांची मान्यताप्राप्त यंत्रणेकडून तपासणी केली असता सर्व दागिने बनावट आढळले. तिवारी राहत्या पत्त्यावरून गेले दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. अखेर १४ सप्टेंबरला राजाराम तिवारीसह बँकेचे नियुक्त सराफ ललित जैन व अरुण सोनी या तिघांविरुद्ध कटकारस्थान करून खोटे प्रमाणपत्र देत बँकेची फसवणूक केली म्हणून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.........

Web Title: Bank charges Rs 11 lakh against two bullion dealers