बदलापूर पालिकेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:05 IST2018-07-27T00:02:46+5:302018-07-27T00:05:20+5:30

इमारतीची दुरवस्था; बाहेरुन चकाचक आणि आतून ठिबक सिंचन

Badlapur water leak | बदलापूर पालिकेला गळती

बदलापूर पालिकेला गळती

बदलापूर : पालिकेचा ३५० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या बदलापूर पालिकेला स्वत:ची प्रशासकीय इमारत अजूनही बांधता आलेली नाही. पालिकेचे कामकाज दुबे रुग्णालयाच्या इमारतीमधून हाकले जात आहे. मात्र या इमारतीचीही नियमित दुरूस्ती केली जात नाही. प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करून पालिकेला देखणे रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पालिका कार्यालयाची परिस्थिती बिकट झाली असून अनेक ठिकाणी छत गळत आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्राचा होणारा विकास हा सर्वांनाच माहित आहे. बदलापूरचा विकास साधण्याची जबाबदारी ज्या पालिकेवर आहे त्या पालिकेच्या कार्यालयाची मात्र पूर्ण वाताहत झाली आहे. मूळात वाढत्या बदलापूर शहरला पालिकेची स्वत:ची इमारत अद्याप बांधता आलेली नाही. पालिकेचे कार्यालय अनेक वर्ष दुबे रूग्णालयातच थाटले आहे. रूग्णालयाची जागा हडप करून हे कार्यालय सुरु आहे.
गेली अनेक वर्ष प्रशासकीय इमारतीचा प्रश्न केवळ कागदावरच आहे. कधी निधी नव्हता, तर कधी इमारतीच्या बीओटी प्रकल्पातच भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. तर कधी निधी येऊन तो परत गेला. या सर्व प्रकारामुळे पालिकेची प्रशासकीय इमारत ही केवळ कागदावरच राहिली आहे. प्रशासकीय इमारतीची जागा निश्चित झाल्यावर नव्याने इमारतीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत जुन्याच इमारतीत कामकाज करावे लागणार असल्याची कल्पना अधिकाऱ्यांना आली आहे. त्यामुळेच पालिकेच्या जुन्या इमारतीला नवे रूप देण्याची धडपड पालिका प्रशासन करत आहे. इमारतीची बाहेरून रंगरंगोटी, प्रवेशद्वाराला अ‍ॅल्युमिनीयम शिट लाउन देखणे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते काम पूर्णही झाले आहे. बाहेरून इमारत छान वाटत असली तरी पालिका कार्यालयातील आतली परिस्थिती ही भयाण आहे.
कार्यालयाचे छत गळत असल्याने अनेक ठिकाणी इमारतीच्या भिंतींना ओल पकडली आहे. पालिका सभागृहाची दुरवस्था झाली आहे. सभागृहच्यावर असलेल्या पत्र्यांना गळती लागल्याने सभागृहात लावण्यात आलेले जिप्सन शिट खाली पडली आहे.

प्रशासनाकडून उपाययोजना नाही
पालिकेतील इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागत असल्याची कल्पना असतानाही पालिकेने पावसाळ््यापूर्वी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. बाहेरून कार्यालय सुंदर करण्याच्या नादात पालिका अधिकाºयांना स्वत:च्या कार्यालयाची आतली परिस्थिती बदलता आलेली नाही.
मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांचे दालन स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात कर्मचारी पुढाकार घेत आहेत. मात्र इतर कार्यालयाची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे समोर आले आहे.
सभागृहाच्या छताला गळती लागल्याने ते कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सभागृहातील कामकाज सुरू असताना दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे.

Web Title: Badlapur water leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.