तब्बल १,९५५ झाडांवर ठाण्यात कोसळणार कुऱ्हाड; घोडबंदर, कोस्टल रस्त्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:54 IST2025-03-06T09:51:59+5:302025-03-06T09:54:02+5:30

वृक्षतोडीचा खर्च एमएमआरडीए करणार, कापूरबावडी ते गायमुख रस्त्याचे कॉंक्रीटीकरणासाठी ५६० कोटी

axe to fall on 1955 trees in thane | तब्बल १,९५५ झाडांवर ठाण्यात कोसळणार कुऱ्हाड; घोडबंदर, कोस्टल रस्त्याचे काम

तब्बल १,९५५ झाडांवर ठाण्यात कोसळणार कुऱ्हाड; घोडबंदर, कोस्टल रस्त्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदरचा सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्तेकामात १,६४६ वृक्ष बाधित होणार आहेत. तसेच खारेगाव ते बाळकुम ते भाईंदर (गायमुख) या कोस्टल रस्तेकामात ३०९ असे एकूण १,९५५ वृक्षांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यासंदर्भातील निविदा पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने काढली आहे. या वृक्षतोडीचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचा दावा वृक्ष प्राधिकरणने केला आहे.  

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होते. मेट्रो सुरू झाल्यानंतरही  वाहतूककोंडीची शक्यता आहे.  कापूरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च आहे.

वृक्षतोडीची निविदा प्रसिद्ध 

रस्तेकामात कापूरबावडी ते गायमुखपर्यंत २,१९६ वृक्ष बाधित होणार आहेत. त्यातील ५४९ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. उर्वरित १,६४६ वृक्ष तोडले जाणार आहेत. या वृक्षतोडीचा प्रस्ताव एमएमआरडीएने ठाणे पालिकेला पाठविला होता. परंतु, आता पालिकेने कमीत कमी वृक्षांची तोड व्हावी, या उद्देशाने एमएमआरडीएने विचार करावा, अशा आशयाचे पत्र धाडले असले तरी पालिकेने नमते घेत या वृक्षांच्या तोडीची निविदा प्रसिद्ध केली आहे.

किनारी मार्गाचेही रुंदीकरण 

दुसरीकडे खारेगाव बाळकुम ते भाईंदर (गायमुख) पर्यंत खाडीकिनारी मार्गाचे ४० मी. रुंद रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. या कामात ३०९ वृक्ष बाधित होणार असून, २६३ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. एकूणच या दोन्ही प्रस्तावांनुसार एकूण १,९५५ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. परंतु, बाधित होणारे वृक्ष कोणत्या प्रजातीचे आहेत, किती वर्षे जुने आहेत, त्याची माहिती देण्यास वृक्ष प्राधिकरणने नकार दिला आहे.

माहिती हवी असल्यास अर्ज करा

कोणत्या प्रजातीचे वृक्ष बाधित होणार आहेत, यासाठी किती खर्च केला जाणार, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मागितली असता माहिती अधिकार टाका. त्यानंतर तुम्हाला माहिती देतो, असे उत्तर दिले.

 

Web Title: axe to fall on 1955 trees in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे