‘एव्हॉन लाइफ’च्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
By Admin | Updated: June 20, 2016 04:06 IST2016-06-20T04:06:34+5:302016-06-20T04:06:34+5:30
इफेड्रीनचे भारतातील मुख्य केंद्र असलेल्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. कंपनीतील कर्मचाऱ्यांची चौकशी ठाणे पोलिसांनी रविवारी सुरू केली

‘एव्हॉन लाइफ’च्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
ठाणे : इफेड्रीनचे भारतातील मुख्य केंद्र असलेल्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. कंपनीतील कर्मचाऱ्यांची चौकशी ठाणे पोलिसांनी रविवारी सुरू केली. सहायक पोलीस आयुक्तांसह १० ते १५ जणांचे पथक सोलापुरात कर्मचाऱ्यांची चौकशी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेतील मुख्य-सूत्रधार पुनीत श्रींगी याची चौकशी करण्यासाठी गुजरात पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. कंपनीचे मॅनेजर मनोज जैन याचाही ताबा गुजरात पोलिसांनी मागितला होता. मात्र, त्याची चौकशी ठाणे पोलिसांमार्फत पूर्ण झाली नसल्याने त्याचा ताबा देण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इफेड्रीनप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीसह डॉ. अब्दुला आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे आरोपींची संख्या १७ वर गेली असून, यातील १० जणांना अटक केली आहे. उर्वरित ७ जणांना फरार घोषित केले आहे. दिवसेंदिवस नवनवीन बाबी पुढे येत असल्याने याचदरम्यान, ज्या ठिकाणी इफेड्रीनचा साठा सापडला, त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकशीसाठी सहायक पोलीस आयुक्तांसह ४ अधिकारी आणि कर्मचारी असे १० ते १५ जणांचे पथक शनिवारी रात्री सोलापूरला रवाना झाले. कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची एकाच वेळी चौकशी करणे शक्य नसल्याने, टप्प्या-टप्प्याने चौकशी सुरू आहे. त्यानुसार, रविवारी ४० ते ५० कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. या वेळी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक उपस्थित होते. (प्रतिनिधी)