बुलेट ट्रेनसाठी भाजपची आजच्या ऑनलाइन महासभेला हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:45 IST2020-12-18T00:44:45+5:302020-12-18T00:45:06+5:30
मागील काही महिने बुलेट ट्रेनच्या जमिनीच्या मोबदल्यात निधी असा प्रस्तावही सत्ताधाऱ्यांनी राखून ठेवला आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

बुलेट ट्रेनसाठी भाजपची आजच्या ऑनलाइन महासभेला हजेरी
ठाणे : ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष महासभा घ्यावी, यासाठी हट्ट करणारे भाजपचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या ऑनलाइन महासभेला हजेरी लावणार आहेत. गेल्या काही महासभांमध्ये सहभागी न झाल्यामुळे चुकीचे विषयही मंजूर करून घेतले जात असल्यानेच शुक्रवारी होणाऱ्या ऑनलाइन महासभेत सहभागी होण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या गटमिटिंगमध्ये घेतल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. मागील काही महिने बुलेट ट्रेनच्या जमिनीच्या मोबदल्यात निधी असा प्रस्तावही सत्ताधाऱ्यांनी राखून ठेवला आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेच्या महासभा वेबिनारद्वारे आयोजित केल्या जात आहेत. त्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या महासभेत गोंधळ झाला होता. त्यामुळे ती प्रत्यक्ष घ्यावी, अशी मागणी भाजपने केली होती. कोविड नियमावलींचे पालन करून संसद आणि राज्य विधिमंडळाचे अधिवेशन प्रत्यक्ष पार पडले. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची महासभाही प्रत्यक्ष घ्यावी, अशी मागणी करून ती गडकरी किंवा डॉ. घाणेकर नाट्यगृहात घेण्याची सूचना केली होती. यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु नगरविकासने त्यावर अद्याप उत्तर दिलेले नाही. अशातच आता शुक्रवारच्या ऑनलाइन महासभेत सहभागी होण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तीत क्लस्टर, विकास योजना, जाहिरात, टीएमटी बस खरेदी, कोविडचे साहित्य आदींसह इतर काही महत्त्वाचे विषय पटलावर आहेत. त्यामुळे महासभेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपने दिली.
सभेसाठी आंदोलन
गेल्या दोन वेबिनार महासभांमध्ये भाजपच्या नगरसेवकांना अनेक विषयांवर भूमिका मांडता आलेली नव्हती. यामुळे महासभा प्रत्यक्ष घ्यावी, या मागणीसाठी महापालिका मुख्यालयात भाजपच्या नगरसेवकांनी दोन महासभांमध्ये आंदोलन केले होते.