सैफवरील हल्ला : बेकायदेशीर बांगलादेशींवरील कारवाई ठाणे पोलीस तीव्र करणार
By जितेंद्र कालेकर | Updated: January 19, 2025 22:34 IST2025-01-19T22:33:44+5:302025-01-19T22:34:50+5:30
आतापर्यंत २५ बांग्लादेशी जेरबंद: ठाणे, भिवंडी, कल्याणमध्ये कारवाई

सैफवरील हल्ला : बेकायदेशीर बांगलादेशींवरील कारवाई ठाणे पोलीस तीव्र करणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अभिनेता सैफअली खान याच्यावरील हल्ल्यातील आराेपी हा बांग्लादेशी संशयित असल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुळेच आधीच सुरु असलेली बांग्लादेशी नागरिकांवरील कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी लाेकमतला दिली.
डिसेंबर २०२४ पासून ठाणे शहर पाेलिसांनी संपूर्ण पाेलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३५ पाेलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात भारतात बेकायदेशीरपणे घुसखाेरी करुन वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशींवर पाेलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये स्थानिक पाेलिसांसह ठाणे गुन्हे शाखेने वेगवेगळया कारवाईमध्ये २५ पेक्षा अधिक बांग्लादेशींची धरपकड केली आहे. आता ही माेहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी बांधकामांच्या ठिकाणांसह मजूरांच्या वस्तीच्या भागात काेंबिंग ऑपरेशन केले जाणार आहे.
यासाठी मजूर कॅम्प, मजूरांचे घाेळके अशा ठिकाणी अचानक तपासणी करुन त्यांच्या अधिकृत वास्तव्याची माहिती घेतली जाणार आहे. अशा बांग्लादेशींच्या संशयास्पद हालचाली, त्यांची माहिती मिळाल्यावर त्याठिकाणी पारपत्र कायद्याखाली कारवाई केली जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
ठाण्यात मुंबई पाेलिसांनी ताब्यात घेतलेला सैफ अली खान याच्यावरील हल्लेखाेर हा देखिल बांग्लादेशी असल्याची माहिती समाेर आल्याने मुंबई आणि ठाण्यातील बांग्लादेशींच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच आता त्यांच्यावर कारवाईची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. या सर्वच पाश्र्वभूमीवर आता ही माेहीम तीव्रपणे राबविली जाणार असल्याची माहिती ठाणे पाेलिसांनी दिली.