मुंबई विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:34 IST2019-07-14T22:27:57+5:302019-07-14T22:34:02+5:30
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नव बाल विद्यामंदिर स्कूल या शाळेत मुख्याध्यापक पद उपभोगणा-या कल्लूराम जैसवार याला कापूरबावडी पोलिसांनी निवृत्तीनंतर सहा वर्षांनी अटक केली आहे. निवृत्तीच्या कागदपत्रांची पडताळणी करतांना तब्बल २४ वर्षांनी संस्थेच्या निदर्शनास हा प्रकार आला. २६ वर्षे शासन आणि संस्थेला अंधारात ठेवल्याप्रकरणी जैसवारविरुद्ध संस्थेने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

निवृत्तीनंतर सहा वर्षांनी झाली अटक
ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेची पदवी आणि कलाध्यापक पदवी (बीएड) या वर्गांची बनावट प्रमाणपत्रे बनवून त्याआधारे ठाण्याच्या नव बाल विद्यामंदिर स्कूल या शाळेमध्ये मुख्याध्यापकपद भोगून शासनाची तसेच शैक्षणिक संस्थेची फसवणूक करणा-या कल्लूराम जैसवार (६४) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील हरेकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे मुख्य विश्वस्त तथा अध्यक्ष लक्ष्मीचंद आहुजा यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार १९८७ मध्ये त्यांनी त्यांच्या संस्थेअंतर्गत आझादनगर येथील नव बाल विद्यामंदिर ही शाळा चालवण्यासाठी घेतली. तेव्हापासूनच कल्लुराम जैसस्वार हे मुख्याध्यापक म्हणून तिथे कार्यरत होते. १० मे २०१३ रोजी ते या पदावरून निवृत्तही झाले. त्यापूर्वीच २०११ मध्ये त्यांच्याकडे संस्थेने निवृत्तीनंतर देण्यात येणारा भविष्य निर्वाह निधी तसेच निवृत्तीवेतनासाठी बीए आणि बीएड पदवीच्या मूळ प्रमाणपत्रांची विचारणा केली. तेव्हा त्यांनी संस्थेकडे मूळ प्रमाणपत्रांऐवजी झेरॉक्स प्रती सुपूर्द केल्या. आपले संपूर्ण रेकॉर्ड हे शिक्षण विभागाकडे जमा केलेले असल्याचाही त्यांनी दावा केला. यातूनच संस्थाध्यक्ष आहुजा यांच्यासह शालेय प्रशासनाला याबाबत संशय आला. याचीच पडताळणी करण्यासाठी ३१ मे २०११ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील कार्यालयात त्यांनी जैसवार यांनी संस्थेला दिलेली बीए आणि बीएडच्या पदवीच्या प्रमाणपत्रांबाबत चौकशी केली. तेव्हा, जैसवार यांनी दिलेली प्रमाणपत्रे बोगस असल्याचे लेखी पत्रच मुंबई विद्यापीठ प्रशासनाने २२ जून २०११ रोजी दिले. तेव्हाच जैसवार याने बोगस व बनावट पदवीच्या आधारावर मुख्याध्यापक या पदावर राहून शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, संस्थेनेही त्यांची या प्रकरणात चौकशी केली. पण, मूळ प्रमाणपत्रे सादर करण्याच्या अधीन राहून ते २०१३ मध्ये निवृत्त झाले. संस्थेने केलेल्या चौकशीमध्येही ते कालांतराने दोषी आढळले. १९८७ ते १० मे २०१३ या कालावधीमध्ये नव बाल विद्यामंदिरमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे २६ वर्षे मुख्याध्यापकपद उपभोगून शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाध्यक्ष आहुजा यांनी अखेर १३ जुलै २०१९ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो दाखल होताच निवृत्तीनंतर सहा वर्षांनी जैसवार याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या सर्व प्रमाणपत्रांची आणि इतरही कागदपत्रांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एन.बी. गिरासे यांनी सांगितले.