ठाण्यात पोलिस भरतीवर अॅण्टी डोपिंग पथकाची करडी नजर, दोषींवर होणार फौजदारी कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: January 9, 2023 22:48 IST2023-01-09T22:47:36+5:302023-01-09T22:48:20+5:30
भरतीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतूनही त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.

ठाण्यात पोलिस भरतीवर अॅण्टी डोपिंग पथकाची करडी नजर, दोषींवर होणार फौजदारी कारवाई
ठाणे : सध्या राज्यभरात पोलिस भरती सुरू आहे. रायगड आणि नांदेड येथील भरतीदरम्यान परीक्षार्थींनी अॅक्सी बूस्ट हे अंमली पदार्थ घेतल्याची बाब उघड झाल्यामुळे ठाणेपोलिसांनीही असा प्रकार ठाण्यात घडू नये यासाठी विशेष अॅन्टी डोपिंग पथक तयार केले आहे. भरतीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतूनही त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.
ठाण्यात ३६४ पुरुष आणि १५७ महिला अशा ५२१ जागांसाठी ३९ हजार ३३८ इतक्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अमली पदार्थ सेवनाला प्रतिबंध करण्यासाठी सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक तयार केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने हे पथक औषध दुकानांत, तसेच साकेत मैदानाच्या परिसरात करडी नजर ठेवणार आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांच्या बॅगांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पोलिस अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी आणि केमिस्ट तसेच ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांचाही या पथकात समावेश राहणार आहे.
उमेदवारांची बायोमेट्रिक व मॅन्युअली तपासणी करून त्यांना भरती प्रक्रियेत सोडण्यात येते. अंमली पदार्थाच्या सेवनाचा संशय आल्यास संबंधित उमेदवारांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतील. तसे आढळल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल शिवाय, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- दत्तात्रय कराळे, सह. पोलिस आयुक्त, ठाणे शहर
प्रलोभनांना बळी पडू नका
पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. त्यासाठी साकेत येथील मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शिवाय, या प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंगही केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभन अथवा भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी केले आहे. तसा फलकही भरती केंद्राच्या बाहेर लावला आहे.