कोपर स्थानकात आणखी एक फलाट उभारला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:58 IST2018-10-30T23:57:48+5:302018-10-30T23:58:05+5:30
मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वेस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथे लवकरच आणखी एक नवीन फलाट उभारण्यात येणार आहे.

कोपर स्थानकात आणखी एक फलाट उभारला जाणार
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वेस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथे लवकरच आणखी एक नवीन फलाट उभारण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे हा फलाट होणार आहे.
डोंबिवली स्थानकावरील गर्दीचा ताण हलका करण्यासाठी काही वर्षांपूर्वीच कोपर रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या स्थानकातून ३० हजारांच्या आसपास प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्याचा फलाट अपुरा पडत आहे.
गेल्या वर्षी परळ स्थानकात झालेली भयानक दुर्घटना लक्षात घेऊन शिवसेनेचे स्थानिक व ज्येष्ठ नगरसेवक म्हात्रे यांनी आणखी एक प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी डॉ. शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेत डॉ. शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला आणि या नवीन फलाटाला मंजुरी मिळवली. तसेच गर्दी होऊ नये, यासाठी सध्याच्या पादचारी पुलांची रुंदीही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचा मोठा दिलासा मिळू शकेल. दरम्यान, या नव्या फलाटाच्या जागेची म्हात्रे आणि रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली. लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.