Another girl abducted in Thane | ठाण्यात आणखी एका मुलीचे अपहरण
ठाण्यात आणखी एका मुलीचे अपहरण

ठाणे : कळव्याच्या भीमनगर भागातून चौदावर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका अठरावर्षीय मुलीचे घोलाईनगर भागातून अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात या मुलीच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

कळव्याच्या घोलाईनगरातील विश्वकर्मा चाळीत राहणारी ही अठरावर्षीय मुलगी ६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली होती. ती रात्री उशिरापर्यंत परतलीच नाही. ती वास्तव्यास असलेल्या घोलाईनगर, रेल्वेस्थानक परिसर तसेच तिच्या मित्र, मैत्रिणींकडे आणि नातेवाइकांकडेही तिचा शोध लागला नाही. उंची चार फूट दोन इंच, सावळा रंग, सडपातळ बांधा, डोळे आणि केस काळे तसेच हातात लाल धागा आणि गळ्यात तावीज असलेल्या या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तिच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आठवड्यात तिसरी घटना

अल्पवयीन मुली बेपत्ता किंवा अपहरण होण्याची ठाणे शहरातील एकाच आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. याआधी वागळे इस्टेट, इंदिरानगर येथील सोळावर्षीय मुलगी आणि कळवा येथील भीमनगर भागातील चौदावर्षीय मुलीचेही ४ डिसेंबर रोजी अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. आता तिसरी तक्रार दाखल झाल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Another girl abducted in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.