भाजपच्या अनधिकृत निवडणूक जाहिरातप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल
By धीरज परब | Updated: May 16, 2024 21:46 IST2024-05-16T21:46:32+5:302024-05-16T21:46:47+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आचार संहितेचे उल्लंघन करून विनापरवानगी भाजपच्या जाहिरात प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल ...

file photo
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आचार संहितेचे उल्लंघन करून विनापरवानगी भाजपच्या जाहिरात प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोडच्या जे पी इन्फ्रा मधील इस्टेला इमारतीच्या तळमजल्यावर डी विंग येथील लिफ्टच्या बाजुला एल. ई. डी. स्क्रिन वर गृहनिर्मण संस्थेच्या आवारात भाजपाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकिय जाहीरात चालु होती. त्यावर महायुतीच्या अन्य पक्षांच्या नेत्यांची छायाचित्र व निवडणूक चिन्ह देखील होती . मे. ऍड ऑन मो प्रा.ली. ह्या हैद्राबादचा पत्ता असलेल्या कंपनीने जाहिरात केल्याचे सांगण्यात आले.
ह्या बाबत ९ मे रोजी आयोगाच्या सी व्हिजिलंस ऍप वर तक्रार केली गेली होती . आचार संहिता पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केल्यावर राजकीय जाहिरात बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे आढळून आले होते . १४ मे रोजी या प्रकरणी पथकातील महापालिकेचे कनिष्ठ अभियंता यांच्या फिर्यादी वरून काशिगाव पोलीस ठाण्यात विवेक धीरेंद्र शुक्ला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.
ह्या आधी महामार्गावर होर्डिंगवर विनापरवानगी जाहिरात केल्या बद्दल २१ एप्रिल रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .