Mahalaxmi Express : रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:31 PM2019-07-27T23:31:27+5:302019-07-27T23:31:49+5:30

काहींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

 Anger over the railway administration and praise on the NDRF | Mahalaxmi Express : रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने

Mahalaxmi Express : रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने

Next

- पंकज पाटील

बदलापूर : तब्बल १४ तासांहून अधिक काळ महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी रेल्वेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अंबरनाथ ते वांगणी या रेल्वेमार्गावर पाणी साचल्याची पूर्वकल्पना असतानाही रेल्वेस्थानकात तासभर उभी केलेली गाडी पुढे का सोडण्यात आली, असा सवाल सुटका झालेले प्रवासी करत होते. गाडीत खानपानाची व्यवस्था नसल्याने त्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. त्याचवेळी अत्यंत कमी कालावधीत एनडीआरएफच्या जवानांनी पुरातून सुखरूप सुटका केल्याने त्यांची आणि मदतीला धावून आलेल्या स्थानिकांची प्रवाशांनी तोंडभरून स्तुती केली.
रेल्वे डब्यांत अडकलेल्या प्रवाशांनी सर्वप्रथम आपल्या नातलगांना फोन केले. त्यानंतर, काहींनी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष, रेल्वे पोलीस यांना फोन केले. काहींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वट करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नांना फारसे यश न आल्याने प्रवासी चिडले.
एनडीआरएफची टीम पोहोचल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला. दोन हेलिकॉप्टर त्या परिसरात घिरट्या घालू लागल्याने मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांना जाणवले. सुटका झालेले प्रवासी रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होते. एनडीआरएफ व स्थानिकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

रुळांवर पाणी साचले आहे, याची कल्पना असतानाही रेल्वेने गाडी पुढे सोडली, हा प्रचंड हलगर्जीपणा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने काही केले नाही. गाडीत खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने हाल झाले. रेल्वेचे बेजबाबदार वर्तन निषेधार्ह आहे.
- संदीप शिंदे, परळ, मुंबई
कोल्हापूरला दोनदिवसीय साहित्य संमेलन असल्याने मी व माझे सहकारी महालक्ष्मीने निघालो होतो. मात्र, ही गाडी कल्याणनंतर संथगतीने जात होती. अंबरनाथ स्थानकाजवळ गाडी दोन तास थांबवण्यात आली होती. गाडी पुढे जाऊ शकत नाही, याची कल्पना होती, तर ती पुढे सोडून शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे काम रेल्वेने का केले?
- प्रतीक धनावडे, ठाणे

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मी जात होते. सुरुवातीपासूनच गाडी पुढे जाणार की नाही, अशी परिस्थिती होती. रात्रीच्या अंधारात गाडी अनेक ठिकाणी थांबत होती. अंबरनाथ स्थानकातही दोन तास गाडी थांबली. मात्र, बदलापूर स्थानक सोडल्यावर गाडी जी थांबली, ती पुढे सरकलीच नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे, त्या स्थितीतच राहावे लागले. गाडी अडकल्यावर रेल्वेने सुरुवातीला मदत पाठवणे गरजेचे होते. मात्र, कोणतीच मदत रेल्वेकडून आली नाही. एनडीआरएफच्या टीममुळे आम्ही आज सुखरूप आहोत.
- रुचा घायवट, टिटवाळा

रेल्वेला प्रवाशांची कोणतीच चिंता नाही, हे सिद्ध झाले आहे. प्रवाशांचा जीव टांगणीला लावून रेल्वेने आपली बेपर्वाई दाखवली आहे. गाडीच्या आत पाणी येत असतानाही कोणतीच मदत आली नाही. पाण्यासोबत डब्यात साप आल्याने सर्वांच्या मनात भीती बसली. अवघड परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आमच्यावर आली. या प्रकारानंतर किमान रेल्वेने प्रवाशांच्या जीवितासोबत खेळू नये.
- आशा भरोडे, मुंबई
मुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी आम्ही डोंबिवलीला आलो होतो. रात्रीची गाडी पकडल्यावर रात्रभर गाडीत आराम करून सकाळी कोल्हापूरला उतरणार होतो. मात्र, गाडीच पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने आमचा जीव टांगणीला लागला होता. रात्र अत्यंत वाईट गेली. कोणतीच मदत आम्हाला रेल्वेकडून मिळाली नाही. सकाळी स्थानिकांकडून आणि बचाव पथकाकडूनच मदत मिळाली.
- सुरेश जोशी, मिरज

आधीच आजारपण, दम्याचा प्रचंड त्रास, त्यात गाडी अडकल्याने जीव टांगणीला लागला होता. आता जीव जातोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. बचाव पथकाने बाहेर काढले. मात्र, बाहेर काढल्यानंतर डोंगर ओलांडून गावात जाण्याची ताकद नव्हती. अर्ध्यावरच बसून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामस्थांनी मदत केल्याने खाली सुखरूप आले.
- शोभा पवार, कोल्हापूर

Web Title:  Anger over the railway administration and praise on the NDRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.