मुख्यमंत्र्यांना ओवाळणी भेटीत अंगणवाडी सेविकांकडून मानधन वाढीची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 22:40 IST2022-10-26T22:40:02+5:302022-10-26T22:40:50+5:30
Anganwadi workers : आतुरतेने वाट पाहणार्या अंगणवाडी सेविकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानी भाऊबीजे निमित्त नुकतीच भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांना ओवाळणी भेटीत अंगणवाडी सेविकांकडून मानधन वाढीची मागणी!
- सुरेश लोखंडे
ठाणे - आतुरतेने वाट पाहणार्या अंगणवाडी सेविकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानी भाऊबीजे निमित्त नुकतीच भेट घेतली. यावेळी सेविकांनी ओवाळणीमध्ये मानधन वाढ करण्याची मागणी त्यांच्याकडे लावून धरली असता लवकरच समाधानकारक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
वेळात वेळ काढून मुख्यमंत्र्यांनी या सेविकांची रात्री ८ वाजता भेट घेतली आणि भाऊबीज निमित्त त्यांच्या विविध समस्या ऐकून घेत मानधन वाढीच्या दृष्टीने सकारात्मक व समाधानकारक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आगामी जिल्हा परिषद निवडणूक होण्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या सेविकांना दिले. विविध प्रयत्न करूनही मानधनात वाढ होत नसल्यामुळे राज्यातील काही अंगणवाडी सेविकांनी आज भाऊबीजेच्या सणाचे औचित्य साधून त्यांना या दिवशी देण्यात येणाऱ्या ओवाळणीत मानधन वाढीची मागणी केली आणि त्यास अनुसरून त्यांनी आज सेविकांचे समाधान केले.
राज्यभरातील सेविकांच्या मानधन वाढीची ही जिव्हाळ्याची मागणी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अॅड. एम. ए. पाटील व सरचिटणीस बृजपाल सिंह, सूर्यमणी गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी ऐन भाऊबीजेच्या दिवशी केली. ठाण्यात एकत्र येत या सेविकांनीराज्यात दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केल्याचे या संघटनेचे नेते राजेश सिंग यांनी सांगितले.
राज्यभरातील या सेविका दारिद्र्य रेषेखालील आहेत. पोषक आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य सेवा आदी सेवा देणाऱ्या या सेविकांना आजपर्यंत किमान वेतन मिळत नाही. महागाई भत्ता मिळत नाही. त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनामध्ये वाढ करण्यासाठी त्या वेळोवेळी धरणं, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधत आहेत. पण आज भाऊबीजेच्या सणाचे औचित्य साधून त्यांनी भाऊबीज ओवाळणीत भरीव मानधन वाढीसह विविध मागण्या त्यांच्याकडे केल्या आहेत. त्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे या सेविकांना सांगितले.