आनंद दिघे यांच्या प्रश्नावर शिवसैनिक झाले निरुत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:05 AM2019-03-31T05:05:51+5:302019-03-31T05:06:30+5:30

इलक्शन आठवणी

Anand Dighey's question became Shivsainik | आनंद दिघे यांच्या प्रश्नावर शिवसैनिक झाले निरुत्तर

आनंद दिघे यांच्या प्रश्नावर शिवसैनिक झाले निरुत्तर

Next

राजेंद्र देवळेकर

सन १९८९ मधील निवडणुकांचा काळ होता. त्यावेळी लोकसभेच्या उमेदवारांसाठी ठाणे जिल्हाभर काम करावे लागत होते. दिवंगत नायब राज्यपाल, भाजपाचे खासदार रामभाऊ कापसे हे त्यावेळी शिवसेना-भाजपातर्फे लोकसभेसाठी उभे होते. त्यावेळीही शिवसेना-भाजपाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस, कुरबुरी, नाराजी होती. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. पण, त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप नव्हते. प्रचारामध्ये फारसा वेग नसल्याने नाराजीची कुणकुण स्व. आनंद दिघे यांना लागली. त्यांनी त्यांच्या स्टाइलप्रमाणे कल्याणमधील शिवसैनिकांना ठाण्यात टेंभीनाक्यावर ‘आनंदाश्रम’मध्ये बोलावून घेतले. तिथे प्रचंड गर्दी असायची. दिघे यांना कल्याणचे शिवसैनिक आले आहेत, असा संदेश मिळाला, पण त्यांनी बराच वेळ लक्ष दिले नाही. मध्यरात्री १२.३० वाजल्यानंतर माझ्यासह आलेल्या सगळ्यांना बोलावले. थेट अडचण काय आहे, हे त्यांच्या शैलीत विचारले. त्यांच्यासमोर कोण काय बोलणार? बोलायचे तर कोणी पुढाकार घ्यायचा? पुढाकार घेतल्यावर पुढे काय ऐकावे लागेल, याचा नेम नाही, त्यामुळे सगळे शांत. दिघे यांनी पुन्हा विचारले, काही अडचण नाही ना? मग, उद्या सकाळपर्यंत कल्याणमधील सर्व भिंती, मोक्याची ठिकाणे हेरा आणि त्यावर रंगरंगोटी करून एसएस-बीजेपी असे लिहून टाकण्याचे आदेश देत तत्काळ तेथून निघण्यास सांगितले.

त्यावेळी आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था एवढी कडक नव्हती. दिघे यांचा आदेश शिरसावंद्य मानून प्रत्येक सैनिक उत्साहाने कामाला लागला. मिळेल त्या मार्गाने रात्रीच कल्याणमध्ये येऊन गेरू, चुना जे मिळेल ते साहित्य घेऊन, दिसेल ती भिंत पांढऱ्या रंगाने रंगवून त्यावर तातडीने शिवसेना-भाजपा, एसएस-बीजेपी असे लिहून टाकले. मी देखील गौरीपाडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघदृष्ट्या केशवनगर खंडमध्ये काम केले. एकही भिंत मोकळी सोडली नाही. शिवाय, दिघे यांच्याकडे झालेल्या भेटीची वाच्यता न करता काम केले. रातोरात सर्वत्र ‘रामभाऊ कापसेंना विजयी करा’ असे संदेश लिहिले गेले. त्यामुळे कल्याणच्या पंचक्रोशीत शिवसैनिकांनी रातोरात भिंती रंगवल्याची एकच चर्चा झाली. लोकसभेचे उमेदवार रामभाऊंनी या भिंती रंगवल्याची दखल घेत मोठ्या मनाने त्यासंदर्भात दिघे यांच्याशी संपर्क करून आभार मानले. दिघे यांनीही तातडीने शहरातील एका महत्त्वाच्या शिवसैनिकाला फोन करत सर्व सैनिकांचे कौतुक केले होते. तसेच त्यावेळी एकच मेळावा व्हायचा, त्यामुळे मेळाव्याला आल्यानंतर भाषणे झाली आणि त्यानंतर रात्रभर दिघे यांनी सैनिकांनी रंगवलेल्या भिंती बघून माझ्यासह काही शिवसैनिकांच्या पाठीवर थाप दिली. ती शाबासकीची थाप अजूनही स्मरणात आहे. त्यानंतर मात्र सायकलवरून जेथे सूचना, आदेश मिळेल, तेथे प्रचंड प्रचारकार्य केले. जिल्हा प्रचंड मोठा होता, पण कल्याणनगरी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आवडती नगरी होती. त्यामुळे तेथे हिंदुत्वाची मशाल तेवत ठेवण्यासाठी प्रचंड काम करा, असे दिघे यांनी सांगितले होते. अखेर, रामभाऊ कापसे भरघोस मतांनी विजयी झाले. मोठी मिरवणूक निघाली. ती जेव्हा गौरीपाड्याच्या पुढे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आली, तेव्हा त्यांना महिला शिवसैनिकांनी ओवाळले, रथातून उतरून रामभाऊंनी देवळेकर हा विजय तुम्हा सगळ्यांचा आहे, असे सांगत पाठीवर कौतुकाची थाप दिली. आपापसांतील नाराजी ही कार्यकर्ते रिकामे असले, तर उफाळून येते, पण तेच कार्यकर्ते कामात व्यस्त असतील, तर नाराजी नाही की, कोणाची उणीदुणी काढायला कोणाला वेळ नसतो, हे दिघे यांनी नेमके हेरले होते. झपाटून, झोकून देऊन काम करायचे आणि आदेश पाळायचा, एवढेच दिघे यांनी आम्हाला शिकवले. त्या काळात भिंती रंगवून झाल्या की, त्यावर मजकूर लिहायचा. त्यानंतर, मतदारयाद्यांमधील नावे शोधून, मतदान केंद्र, बुथ क्रमांक, मतदानाची वेळ, उमेदवार, पक्षचिन्ह असे हाताने स्लिपवर लिहावे लागत होते. त्यांचे ५०-१०० चे विभागवार गठ्ठे करून त्या स्लिप घरोघरी वाटायच्या. अशी भरपूर कामे करायला लागायची. एखाद्या कार्यकर्त्याने चहा, नाश्ता, पोळीभाजी दिली, तरच आमचे दुपारचे जेवण व्हायचे. अन्यथा, संध्याकाळच्या प्रचारफेरीनंतर भेळभत्ता खाण्यासाठी हमखास काळातलाव, तेलवणे गल्ली अथवा रामभाऊंच्या सहजानंद चौकालगत एकत्र भेटायचे. त्यातही खायला किती मिळाले, यापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आम्ही एकत्र यायचो.

(लेखक माजी महापौर व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत.)
(शब्दांकन : अनिकेत घमंडी)
 

Web Title: Anand Dighey's question became Shivsainik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.