मुलगा नसलेल्या वृद्ध पित्याच्या पार्थिवावर मुलींकडून अंत्यसंस्कार, मुखाग्नीही दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:04 IST2022-01-31T15:00:31+5:302022-01-31T15:04:14+5:30
भिवंडी शहरातील नारपोली या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर व विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता.

मुलगा नसलेल्या वृद्ध पित्याच्या पार्थिवावर मुलींकडून अंत्यसंस्कार, मुखाग्नीही दिला
नितिन पंडीत
भिवंडी - मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याचे धन या उक्तीप्रमाणे समाज आजही वावरत असताना भिवंडीत मुलगा नसलेल्या गणपत कृष्णा भोईर या ८७ वर्षीय वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिन्ही मुली पुढे सरसावल्या. मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीपासून त्यांचा व्हिडीओ देखील शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
भिवंडी शहरातील नारपोली या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर व विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. परंतु डोक्यात ताप शिरल्याने मुलगा गणेश मानसिक व्याधीने वयाच्या २५ व्या वर्षी त्याचे निधन झाले. तेव्हा पासून काबाडकष्ट करणाऱ्या गणपत भोईर यांनी सुषमा, सुलोचना, शिल्पा या तिन्ही मुलींना मोठं करून त्यांचे विवाह चांगल्यास्थळी करून दिले.
वय वाढत गेले तसे कष्ट झेपत नसल्याने वार्धक्यात घरीच असलेल्या आईवडिलांचा सांभाळ तिन्ही मुली करीत असताना कधी तिन्ही मुलींकडे हे दाम्पत्य वास्तव्य करुन गुजराण करीत होते. वार्धक्याने गणपत भोईर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. गणपत काका म्हणून ओळखले जाणारे गणपत भोईर यांनी आपल्या हयातीत अनेकांचे संसार बसविण्याचे काम केले. परंतु त्यांच्या वृद्धपकाळात गरिबीमुळे अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याची खंत मुलींनी व्यक्त करत अखेर मुलींनीच तिरडीला खांदा देण्याचा, अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
सुलोचना, शिल्पा यांनी तिरडीला खांदा दिला तर मोठी मुलगी सुषमा हिने तिरडी समोर शिदोरी धरीत स्मशानभूमीत मृतदेहास अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यावेळी उपस्थित सर्वांनी स्वागत करीत मुलगा-मुलगी हा भेद मानणाऱ्या व स्वार्थासाठी नाती जोपासणाऱ्या समाजाला चपराक लगावली असल्याची प्रतिक्रिया दिली. मुलींनी ही कृती करूनच न थांबता आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली,त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.