Amarnath Palika: Sena has betrayed | शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा विश्वासघात, भाजपाला वाटली खैरात!
शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा विश्वासघात, भाजपाला वाटली खैरात!

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत शिवसेनेला अडचणीच्यावेळी सहकार्य करणाऱ्या राष्ट्रवादीला डावलून शिवसेनेने भाजपला सभापतीपदांची खैरात वाटली आहे. भाजप आणि शिवसेनेत सत्तासंघर्ष असताना राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत केल्याने त्यांना पाच वर्ष सभापतीपद देण्याचे निश्चित केले होते. गेल्यावर्षी भाजपला पुन्हा सत्तेत घेत शिवसेनेने राष्ट्रवादीला डावलले. या विश्वासघातामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कर घातला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा बहिष्कार डावलत सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

अंबरनाथ नगरपालिकेच्या सहा विषय समितीच्या सदस्यांची निवड आणि पाच समितींच्या सभापतीपदाची निवडणूक बुधवारी उपजिल्हाधिकारी जगतसिंह गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्व समितीच्या सदस्यांची निश्चिती करण्यात आली. १७ सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील दोन सदस्यांची नावे दिली नाहीत. मूळात राष्ट्रवादीचा एकही सदस्य या ठिकाणी हजर नव्हता. त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार घातला. शिवसेनेने पाच वर्ष सभापतीपद देण्याचे मान्य केले होते. मात्र सलग दुसºया वर्षीही त्यांना डावलण्यात आले. यामुळे त्यांनी निवडणुकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १७ सदस्यांपैकी दोन सदस्यांची पदे रिक्त ठेवली आहेत.
गेल्यावर्षीही राष्ट्रवादीला सभापतीपदापासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र शेवटच्या वर्षी सभापतीपद देणार असे आश्वासन दिल्याने राष्ट्रवादीने सबुरीने घेतले. मात्र शेवटच्या वर्षातही सभापतीपद न मिळाल्याने त्यांनी बहिष्कार घालत आपला राग व्यक्त केला. राष्ट्रवादीला सभापतीपद न देण्याचा निर्णय सेनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.

सभापतीपदी यांची झाली निवड
या वादात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून बांधकाम समितीच्या सभापतीपदी भाजपच्या करुणा रसाळ यांची, पाणी पुरवठा सभापतीपदी राजू शिर्के, आरोग्य सभापतीपदी उत्तम आयवळे, शहर नियोजन समिती सभापतीपदी अनंत कांबळे, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अनिता आदक यांची निवड जाहीर करण्यात आली. तर उपनगराध्यक्ष अब्दुल शेख हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती राहणार आहेत. या सभापतीपदाच्या निवडणुका सलग पाचव्यांदा बिनविरोध झाल्या आहेत.


Web Title: Amarnath Palika: Sena has betrayed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.