युतीचा ११० जागांवर विजयाचा दावा; भाजपचा सन्मान राखण्याची ठाण्यात केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:58 IST2025-12-18T08:57:40+5:302025-12-18T08:58:39+5:30
शिंदेसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून ११० जागांवर विजयाचा दावा करण्यात आला.

युतीचा ११० जागांवर विजयाचा दावा; भाजपचा सन्मान राखण्याची ठाण्यात केली मागणी
ठाणे : शिंदेसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून ११० जागांवर विजयाचा दावा करण्यात आला. भाजपच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी झाली. महायुतीच्या घटक असलेल्या अजित पवार गटाला मात्र बैठकीला पाचारण केले नव्हते.
ठाण्यात शिंदेसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्याने त्यांनी जागावाटपात योग्य तो सन्मान राखावा, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली. पुढील बैठकीत शिंदेसेना जागा वाटपाचा प्रस्ताव देणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत ११० हून अधिक जागांवर विजय मिळेल व महायुतीचा भगवा फडकेल, महापौर महायुतीचाच बसेल, असा दावा दोन्ही पक्षांनी केला.
या बैठकीत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे आणि पूर्वेश सरनाईक उपस्थित होते, तर भाजपकडून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघुले हे पदाधिकारी उपस्थित होते. सव्वातास चाललेल्या या बैठकीत महायुतीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील, याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली.
बंडखोरी टाळण्याकरिता दोन्ही पक्षांनी कसोशीने प्रयत्न करायचा व अधिकृत उमेदवारांच्या विजयाकरिता संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. ठाण्यात शिंदेसेनेकडे अधिक संख्येने माजी नगरसेवक असल्याने सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार ते जास्त जागांवर दावा करतील. मात्र, जागावाटपात भाजपचा योग्य तो सन्मान राखावा, अशी मागणी भाजपने केली. या
अजित पवार गट स्वबळावर
दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी स्वबळाचा नारा दिला. वरिष्ठ पातळीवर भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात अजित पवार गट स्वतंत्र लढणार आहे.
"जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. केवळ निवडणुकीत अधिक नगरसेवक कसे निवडून येतील, त्याचा फॉर्म्युला ठरला. ठाणे महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. पहिल्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे."
- संजय केळकर, आमदार, ठाणे शहर भाजप
"सकारात्मक चर्चा झाली. जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. याठिकाणी मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ अशी परिस्थिती नाही. महापालिका निवडणुकीत ११० हून अधिक नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील आणि महापौर महायुतीचाच बसणार आहे."
- नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे