गुडविनच्या मालकांची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली; २६१ जणांची नऊ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:27 AM2019-11-01T02:27:49+5:302019-11-01T02:28:03+5:30

केरळमध्येही ठाणे पोलीस करणार चौकशी

All bank accounts of Goodwin's owners were frozen by police; 9 crore fraud of 9 people | गुडविनच्या मालकांची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली; २६१ जणांची नऊ कोटींची फसवणूक

गुडविनच्या मालकांची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली; २६१ जणांची नऊ कोटींची फसवणूक

Next

जितेंद्र कालेकर 

ठाणे : सलग दहा वर्षे डोंबिवलीमध्ये सराफाचा व्यवसाय करून अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच शेकडो ग्राहकांनी ‘गुडविन’कडे सोने आणि रोख स्वरुपात गुंतवणूक केली. आता त्याची सर्व बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. केरळच्या त्रिच्चुर या त्याच्या मूळ जिल्हयातही तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत २६१ जणांची नऊ कोटींची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

डोंबिवलीत गुडविनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नौपाडा आणि शिवाजीनगर (अंबरनाथ) या तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत २६१ जणांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांची सुमारे नऊ कोटींची फसवणूक झाल्याची नोंद झाली आहे. बुधवारी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर आणि अशोक उतेकर या दोन पथकांनी गुडविनचा व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार अकराकरण यांच्या डोंबिवलीतील पलावा गोल्ड सिटीमधील ‘सेरिनो’ च्या ए विंग या इमारतीमधील ३०१ आणि २०१ या क्रमांकाच्या सदनिकांची झडती घेतली.

या झडतीमध्ये दोन संगणक आणि घरगुती वापराच्या वस्तुंसह इतर विशेष काहीही हाती लागले नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, गुडविनच्या दुकानांमधील सीसीटीव्हींची हाताळणी आणि दुरुस्ती करणारा मंगेश, सुधीशकुमारचा वाहनचालक विकी आणि सुधीरकुमारचा चालक गणेश बारी यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतही फारसे हाती लागले नसले तरी संगणकाच्या मदतीने काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.

सलग दहा वर्षांचा विश्वास
अनेक दुकानांवर असलेले दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या विश्वासाची परंपरा हे वाक्य हेरूनच गुडविनच्या संचालकांनी डोंबिवलीत सलग दहा वर्षे बऱ्यापैकी सेवा दिली. गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या व्यवहारामध्ये अनेकांना अनियमितता जाणवली. पण मधाळ बोलणे करून इतक्या वर्षांचा विश्वासाचा व्यवसाय असल्याचे सांगत त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून ‘फसवणुकीची परंपरा’ चालू उेवली. पण गुन्हा दाखल होईपर्यंत अनेकांना त्याच्याबद्दल शंकाही आली नाही. गुडविनच्या मालकांकडून त्यांची बाजू मांडणारा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी त्यात तथ्यता नाही. याआधीही फसवणूक करणाऱ्यांनी असेच त्यांची बाजू मांडणारे व्हिडीओ व्हायरल केले होते, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.

शिल्लक रकमेची माहिती घेणे सुरू
सुनीलकुमारसह, गुडविन आणि सुधीशकुमार यांच्या नावावर असलेली फेडरल बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि त्रिच्चुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि सर्व व्यवहारांची माहिती बँक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. - सरदार पाटील, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर

चालकानेही गुंतविले महिना ५०० रुपये
सुनीलकुमारचा वाहनचालक गणेश बारी यानेच सुनिलकुमारसह त्याच्या कुटुंबीयांना सांताक्रूझ येथील विमानतळावर हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी सोडले होते. अगदी, नेहमीसारखेच वातावरण आणि संचालकांचे बोलणे चालणे असल्यामुळे तसेच यापूर्वीही त्यांना अनेकवेळा विमानतळावर सोडले असल्यामुळे ते पळून जात असल्याची किंचितही कल्पना आली नाही. गुडविनमध्ये आपणही महिना ५०० रुपये प्रमाणे गुुंतवणूक केल्याचे चौकशीमध्ये बारी याने पोलिसांना सांगितले.

सव्वा कोटींचा फ्लॅट सुनीलकुमारच्या नावावर
पलावा गोल्ड सिटीमधील ३०१ क्रमांकाची सदनिका ही सुनीलकुमारने भाडयाने घेतली होती. तर २०१ क्रमांकाची सदनिका ही सुधीशकुमारच्या मालकीची आहे. तिची सुमारे एक ते सव्वा कोटींची किंमत असून आतापर्यंतच्या तपासात हीच मोठी मालमत्ता या पथकाच्या हाती लागली आहे. याव्यतिरिक्त डोंबिवलीतील मानपाडा येथील अंकित सोसायटीमधील दोन दुकानांमध्येही झडतीसत्र राबविले जाणार आहे.

त्रिसूरमधील खात्यांचीही चौकशी : गेल्या सात वर्षांपासून गुडविनमध्येच नोकरीला असलेल्या बारी यानेच सुनीलकुमारला केरळ येथेही दोन ते तीन वेळा नेले होते. त्यादृष्टीनेही हे पथक आता तपास करीत असून केरळमधील त्रिसूर या जिल्ह्यातही त्यांची मालमत्ता आणि नातेवाईकांकडे चौकशीसाठी ठाणे पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: All bank accounts of Goodwin's owners were frozen by police; 9 crore fraud of 9 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.