अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि गर्भपात प्रकरणात डॉक्टर अडकला, दोन दिवसाची पोलीस कस्टडी, आतापर्यंत चौघाना अटक
By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 17:34 IST2025-03-03T17:32:25+5:302025-03-03T17:34:20+5:30
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, तीचा ७ महिन्याचा गर्भपात केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी आरोपीसह चौघावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान गर्भपातच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून अटक केली.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि गर्भपात प्रकरणात डॉक्टर अडकला, दोन दिवसाची पोलीस कस्टडी, आतापर्यंत चौघाना अटक
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-३ परिसरात शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, तीचा ७ महिन्याचा गर्भपात केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी आरोपीसह चौघावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान गर्भपातच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरातील ३२ वर्षीय इसमाने शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने, ती ७ महिन्याची गर्भवती राहिली. याबाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून आरोपी सागर ढेमढेरे यांनी सुशीलकुमार सिंग नावाच्या डॉक्टर कडून मुलीला गर्भपातच्या गोळ्या दिल्या. गोळ्या घेतल्यावर मुलीची तब्येत बिघडल्याने, आरोपीने पत्नी, मेव्हणी व सासूच्या मदतीने मुलीला खोटे नाव व वय लपवून मध्यवर्ती रुग्णालयात भरती केले. रुग्णालयात मुलीने ७ महिन्याच्या मृत मुलाला जन्म दिला. आरोपी ढेमढेरे याने मृत अर्भक स्मशानभूमीत पुरले. डॉक्टरांना याबाबत संशय आल्याने, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. अखेर पोलीस चौकशी सर्व प्रकार उघड झाला.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी आरोपी सागर ढेमढेरे याच्यासह त्याला मदत करणारी त्याची पत्नी, मेव्हणी व सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. मात्र तपासा दरम्यान अवैधपणे गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉ सुशीलकुमार सिंग याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून आरोपी ढेमढेरे याच्या सासू व मेव्हणी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधिकारी आवताडे यांनी दिली. मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु असून ७ महिन्याचे पुरलेले अर्भक बाहेर काढून डीएनए चाचणीसाठी पाठविले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.