ठाण्यात कोरोना नियमांची ऐसी की तैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST2021-07-14T04:44:36+5:302021-07-14T04:44:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी चारनंतर अत्यावश्यक ...

ठाण्यात कोरोना नियमांची ऐसी की तैसी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी चारनंतर अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करावीत, असेही स्पष्ट केले आहे. परंतु, ठाण्यात या नियमांची ऐसी की तैसी झाली असून, महापालिका आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने आणि हॉटेलदेखील चार नंतर बिनधास्त सुरू आहेत. काही ठिकाणी अर्धवट शटर सुरू ठेवून ठाणे महापालिकेच्या नाकावर टिच्चून व्यवहार सुरू असून, शनिवार-रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन सांगितले जात असेल तरी येऊरला मात्र या दोन्ही दिवशी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. त्याकडेही पालिका आणि अन्य कोणाकडूनही कारवाई होताना दिसत नाही.
ठाण्यात आतापर्यंत एक लाख ३३ हजार १६४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील एक लाख ३० हजार १३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ एवढे आहे. २०३७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ठाण्याचा मृत्युदर हा १.५३ टक्के एवढा आहे. परंतु, येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने ठाणे शहर दुसऱ्या स्तरात असतानाही राज्य शासनाच्या निर्बंधांना तिसऱ्या स्तरात गेले आहे. त्यानुसार कोरोना नियम अतिशय कठोर केले आहेत. परंतु, त्यांना धाब्यावर बसवून ठाणेकरांनी सर्व व्यवहार जोमात सुरूच ठेवले आहेत.
चारनंतरही शहराच्या मध्यवर्ती भागासह घोडबंदर, कळवा, मुंब्रा, वागळे आदींसह महापालिका मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातही दुकाने सुरू दिसत आहेत. चारनंतर हॉटेलदेखील अनेक भागांत सुरू असल्याचे वास्तव आहे. पार्सलची सुविधा असतानाही चार नंतरही हॉटेलमध्ये नागरिकांचा वावर वाढत आहे. काही ठिकाणी दुकानेच किंवा हॉटेलचे शटर अर्धवट ठेवून व्यवहार सुरू ठेवण्यात येत आहेत. बाजारपेठेतही गर्दी वाढताना दिसत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. जांभळीच्या मार्केटमध्येही गर्दीच गर्दी होत आहे. तिकडे येऊरला तर महापालिका आणि पोलिसांकडून झालेल्या ढिलाईमुळे ठाणेकरांकडून नियमावलीस पायदळी तुडविले जात आहे.
........
या संदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून राज्य शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन झाले पाहिजे त्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. नियमांची कडक अंमलबजावणीसाठी कारवाई करा, असेही सांगणार आहे.
नरेश म्हस्के, महापौर, ठामपा