सवरांच्या घरावर काढणार पुन्हा मोर्चा
By Admin | Updated: October 15, 2016 06:34 IST2016-10-15T06:34:20+5:302016-10-15T06:34:20+5:30
आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर येत्या सोमवारी (दि. १७) मोर्चा काढण्याचा इशारा

सवरांच्या घरावर काढणार पुन्हा मोर्चा
वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर येत्या सोमवारी (दि. १७) मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एका निवेदनाद्वारे दिला आहे.
एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाची योजना आहे. त्याची अंमलबजावणी आदिवासी विभागाने स्वतंत्र केलेली नाही. ही जबाबदारी महिला व बालविकास खात्यावर ढकलली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे काम आदिवासी विकास विभागाने करावे, या योजनेंंतर्गत गर्भवती मातांना चपाती, भाकरी, ५० ग्रॅम तांदूळ, ३० ग्रॅम कडधान्ये, शेंगदाणा लाडू, अंडी, केळी, नाचणी सत्त्व, ५० ग्रॅम हिरव्या भाज्या इत्यादी वस्तू २५ रुपयांत खरेदी करणे अशक्य असल्याने अमृत आहार योजनेची रक्कम ५० रुपये करून द्यावी, आहार तयार करण्यासाठी भांडी खरेदी करण्याकरिता एक हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या निधीत तवा, परात, झाकण, पाण्याची टाकी, बादली आदी वस्तू खरेदी करता येत नसल्याने या निधीत वाढ करावी, आहार तयार करण्यासाठी शेगड्या काही ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पंरतु गॅस सिलिंडर देण्यात आलेले नाही. ते देण्यात यावेत. आहार तयार करण्यासाठी प्रत्येक दिवशी १० रुपये किंवा महिन्याला २५० रुपये मोबदला देण्यात येतो. ही रक्कम अत्यंत कमी आहे. ती दरमहा एक हजार करण्यात यावी. (वार्ताहर)