अखेर स्वच्छतागृहांची होतेय नियमित स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:47+5:302021-07-27T04:41:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता पाहता केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक ...

अखेर स्वच्छतागृहांची होतेय नियमित स्वच्छता
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता पाहता केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला असताना मनपा कार्यालयातील स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने मांडला होता. ‘पालिकेने कार्यालयांचीही पाहणी करावी’ या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल खुद्द आयुक्तांनी घेतली आहे. मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश देताच आता नियमितपणे डोंबिवली विभागीय कार्यालयातील स्वच्छतागृहांची आणि दालनांची स्वच्छता होत आहे.
संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी केडीएमसीच्या हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित पाहणी करण्याचे आदेश सूर्यवंशी यांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवली जावीत, याबाबत आयुक्तांनी उपायुक्तांना बजावले आहे. परंतु, एकीकडे स्वच्छतेचे आदेश देताना दुसरीकडे मनपाच्या कार्यालयांमधील स्वच्छतेकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुद्दा ‘लोकमत’ने शनिवारी मांडला होता. त्याची दखल घेत सूर्यवंशी यांनी तेथील प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना करीत तत्काळ स्वच्छता करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी स्वच्छतागृहांची स्वच्छता झालीच. त्याचबरोबर रविवारी आणि सोमवारीही स्वच्छता झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, या स्वच्छतेत सातत्य राहावे, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून होत आहे.
-------------------------