३० वर्षांनंतर आजीबाई आपल्या गोतावळ्यात परतल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:45 IST2025-01-22T09:43:39+5:302025-01-22T09:45:22+5:30
Thane News: तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.

३० वर्षांनंतर आजीबाई आपल्या गोतावळ्यात परतल्या
ठाणे - तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात तिला दाखल केले. मात्र तिच्या घराचा पत्ता नव्हता, कुटुंब कोठे राहते याचा मागमूस नव्हता. अखेर रुग्णालयाने पोलिसांच्या मदतीने त्या आजीबाईंच्या घराचा पत्ता शोधला आणि तिच्या कुटुंबाशी भेट घडवून आणली. ३० वर्षांनंतर आजी आपल्या गोतावळ्यात परतल्या.
मानसिक स्वास्थ्य हरवले
८० वर्षांच्या ताराबाई मोरे (नाव बदलले आहे) या ३० वर्षांपूर्वी घरातून निघून गेल्या. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाई दोन वर्षांपूर्वी नाशिक पोलिसांना आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते.
ताराबाई या कुठून आल्या, याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शोधायचे कसे हा प्रश्न रुग्णालयापुढे होता.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई यांच्यावर उपचार आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली.
‘पंचवटी’ एवढेच म्हणायच्या...
ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारल्यास त्या पंचवटी एवढंच सांगायच्या. याबाबत रुग्णालयाने पंचवटी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, फारसा उपयोग झाला नाही. दरम्यानच्या, काळात ताराबाईंवर समुपदेशन, औषधोपचार सुरू होते.
त्यांच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचे नाव त्यांनी सांगितले असता, रुग्णालयाने पोलिसांशी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली.
पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतला. नुकतेच त्यांना कुटुंबाकडे सुपूर्द केले. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहम्मद फैजल मोहम्मद सादिक, डॉ. मधुरा गायकवाड, यांनी परिश्रम घेतले.
ताराबाई यांचा १३ वर्षांचा मुलगा झाडावर चढला होता. विजेच्या तारेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू बघून ताराबाई यांचे मानसिक संतुलन बिघडले. साधारण ३० वर्षांपूर्वी घरातून न सांगताच बाहेर पडल्या होत्या.
- नितीन शिवदे
(समाजसेवा अधीक्षक, मनोरुग्णालय, ठाणे)