इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा अन्याय विरोधात मंत्रालयावर मोर्चा
By नितीन पंडित | Updated: December 7, 2023 19:25 IST2023-12-07T19:25:02+5:302023-12-07T19:25:57+5:30
न्याय न मिळाल्यास आत्मदाहन करण्याचा दिला इशारा.

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा अन्याय विरोधात मंत्रालयावर मोर्चा
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : इगतपुरी तालुक्यातील भावली, चिंचले, आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या आहेत.
शेतजमीन परत मिळाव्यात म्हणून गेल्या २०११ पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव भूमाफियांवर व दलालांवर कारवाई करावी यासाठी शासन दरबारी न्याय मागत आहेत. परंतु शासना कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय हक्का साठी व फसवणूक करून दलालांसह धनदांडग्यांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समाज कंटकां वर कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला आहे. गुरुवारी दुपारी हे मोर्चेकरी भिवंडी तालुक्यातील सोनाळे या ठिकाणी विसाव्यास थांबले होते.या मध्ये असंख्य स्त्री पुरुष वृध्द व लहान मुलांचा सुध्दा सहभाग आहे.
बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेतजमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा,दादागिरी करून तोडलेल्या घरांची भरपाई द्यावी यासह विविध मागण्या या आदिवासी समाज बांधवांच्या आहेत.मुंबई येथे शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून योग्य न्याय आम्हाला न दिल्यास मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही सर्व शेतकरी उपोषण तर काही मंत्रालय समोर आत्मदहन करणार असल्याचं इशारा बेबीताई हिलम या पीडित शेतकरी आदिवासी महिलेने दिला आहे.