उल्हासनगरमधील वाणिज्य कॉम्प्लेक्सवर कारवाईची टांगती तलवार,अवैध बांधकामाचा खुलासा सादर करण्याचे नगररचनाकार विभागाचे आदेश
By सदानंद नाईक | Updated: March 17, 2026 19:04 IST2026-03-17T19:04:07+5:302026-03-17T19:04:17+5:30
Ulhasnagar News: कॅम्प नं-३, शांतीनगर प्रवेशद्वार येथील वाणिज्य कॉम्प्लेक्स मधील अवैध बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये तब्बल ३१ हजार चौरस फुटांचे वाढीव बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या नगररचना विभागाने विकासकाला खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.

उल्हासनगरमधील वाणिज्य कॉम्प्लेक्सवर कारवाईची टांगती तलवार,अवैध बांधकामाचा खुलासा सादर करण्याचे नगररचनाकार विभागाचे आदेश
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-३, शांतीनगर प्रवेशद्वार येथील वाणिज्य कॉम्प्लेक्स मधील अवैध बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये तब्बल ३१ हजार चौरस फुटांचे वाढीव बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या नगररचना विभागाने विकासकाला खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील या भूखंडावर वाणिज्य कॉम्प्लेक्स उभे राहिले असून यामध्ये मोठ्या कंपन्या आणि नामांकित प्रतिष्ठानांची कार्यालये आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम झाल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगररचना विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागाने यापूर्वी पाडकाम कारवाईचा बडागा उगारला होता. मात्र विकासकाच्या विनंतीनंतर ही कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली होती. कॅम्प नं-१ मधील स्पॅक्टवीन नावाच्या बहुमजली इमारतीच्या वाढीव बांधकामबाबत विकासकाला नोटीस दिल्याची माहिती नगररचनाकार बिरारी यांनी नोटीस देऊक कारवाईचे संकेत दिले.
अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत
महापालिका नगररचनाकार विकास बिरारी यांच्या तपासणीत या प्रकल्पात अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. नियमांनुसार आवश्यक असलेली पार्किंग व्यवस्था प्रस्तावात दर्शवण्यात आलेली नाही. नक्शामध्ये मोठ्या त्रुटी असून ३१ हजार चौरस फुटांचे बांधकाम मंजूर आराखड्यापेक्षा जास्त आहे. अवैध बांधकाम नियमित करण्यासाठी विकासकाने दिलेला सुधारित प्रस्ताव पालिकेने फेटाळून लावला आहे. आम्ही विकासकाला नोटीसद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाहीतर, अवैध बांधकामावर तोडकाम कारवाई केली जाईल.
- विकास बिरारी - नगररचनाकार उल्हासनगर महापालिका)