अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Updated: December 9, 2025 00:08 IST2025-12-09T00:08:34+5:302025-12-09T00:08:34+5:30
आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
ठाणे: अवघ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला गराेदर करणाऱ्या साहीद माेहमद हासमी (३०, रा. काशीगाव, जि. ठाणे) याला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षांच्या साध्या कैदेचीही शिक्षा आराेपीला भाेगावी लागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी साेमवारी दिली.
भाईंदरमधील काशीगावात पिडितेची आई एका कंपनीत कामाला हाेती. तिला जेवणाचा डबा देण्यासाठी पिडिता मे २०२१ मध्ये गेली हाेती. त्यावेळी ती घरी परत येताना ओळखीचा असलेल्या आराेपीने तिला त्याच्या माेटारसायकलीवरुन साेडविले हाेते. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी त्याने तिला घरी साेडवितांना त्याच्या घरी नेले. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा लावून तिच्यावर दाेन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास चाकूने तिचा गळा कापण्याचीही त्याने धमकी दिली. यातूनच ती तीन महिन्यांची गराेदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. याप्रकरणी काशीमीरा पाेलीस ठाण्यात विवाहित असलेल्या आराेपी साहीद याच्याविरुद्ध पिडितेच्या आईने ६ ऑगस्ट २०२१ राेजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला त्याच दिवशी पाेलिसांनी अटकही केली. याच खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात ५ डिसेंबर २०२५ राेजी झाली. जिल्हा सरकारी वकील संजय लाेंढे आणि सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आराेपीला शिक्षा हाेण्यासाठी जाेरदार बाजू मांडली. तर आराेपीची बाजू ॲड. बी. आर. बुखारी यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर आराेपीला लैंगिग अत्याचार आणि पाेस्काे अंतर्गतच्या कलमांखाली २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्या. देशमुख यांनी सुनावली.