गाेळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारे आराेपी अटकेत
By जितेंद्र कालेकर | Updated: December 27, 2024 00:58 IST2024-12-27T00:57:47+5:302024-12-27T00:58:07+5:30
दाेन वर्षापूर्वी कापूरबावडीतील घटना.

गाेळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारे आराेपी अटकेत
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दाेन वर्षापूर्वी व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीतून संदीप अडसूळ यांच्यावर गाेळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आराेपीला त्याच्या टाेळीसह जेरबंद केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते उत्तर प्रदेशात राहत हाेते. सर्व आराेपींना ३० डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अडसूळ यांच्यावर ठाण्यातील माजिवडा येथील गणेश वंदन इमारतीसमाेर घराच्या बाहेर दरवाजासमाेर असतांना ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री एका अनोळखी व्यक्तीने रिव्हाॅल्व्हरमधून गोळी झाडली होती. ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्याने ते या गाेळीबारात गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. हा गाेळीबार प्रतीक शर्मा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासातून समोर आले हाेते. या दाेघांचाही इमारतीला लागणारे मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय हाेता. व्यवसायातील स्पर्धेतून प्रतीकने त्यांच्यावर हा हल्ला केला हाेता.
याप्रकरणी कापूरबावडी पाेलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला हाेता तेव्हापासून गाेळीबार करणारा प्रतीक हा त्याच्या साथीदारांसह गेल्या दाेन वर्षांपासून पाेलिसांना गुंगारा देत फरार झाला हाेता. दरम्यान, यातील आरोपी प्रतीक हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे काेलशेत खाडी राेड भागातून सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २५ डिसेंबरला सापळा लावून आरोपी प्रतीक याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे (३२), आकांत पोवळे (२५), तुषार पवार ( ४९) आणि रोहित गंगोत्रे (२६) यांना अटक केली.