लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वेगवेगळ्या बतावण्या करीत फसवणूक करणा-या अरिफ मोहम्मद शेख (४९, रा. मुंब्रा) याला ठाणेनगर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने कौसा, मुंब्रा भागातून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाखांचे १२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.ठाण्यातील ओवळा, कासारवडवली भागात राहणारी कमल शिंदे ही ६७ वर्षीय महिला १६ जानेवारी रोजी जांभळीनाका येथे भाजीखरेदीसाठी गेली होती. ती ‘टाइम स्क्वेअर’ हॉटेलच्या बाजूने जात असताना दोन भामट्यांनी तिला देवपूजा करण्याची बतावणी करीत बोलण्यामध्ये गुंतविले. नंतर तिच्याकडून सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे दागिने आणि ११ हजारांची रोकड असा तीन लाख पाच हजार ७५० रुपयांचा ऐवज घेऊन या दोघांनी पलायन केले होते. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर, सागर पाटील आणि प्रकाश जाधव यांच्या पथकाने तीन दिवस पाठपुरावा करून कौसा, मुंब्रा भागातून १८ जानेवारी रोजी आरिफ शेख याला अटक केली. त्याने या महिलेला बोलण्यात गुंतवून तिची फसवणूक केल्याची कबुली दिली. घाटकोपर येथील एका सराफाकडे फसवणुकीतील दागिने त्याने विकले होते. त्याच्याकडून १२ तोळे सोने हस्तगत केले असून त्याने आणखी किती ठिकाणी अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार केले आहेत, याचा तपास सुरू असून, त्याच्या एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई, ठाण्यात अनेक गुन्हेआरिफ शेख हा त्याच्या साथीदाराच्या मदतीने अशा प्रकारे बोलण्यात गुंतवून ज्येष्ठांसह महिलांचीही गेल्या २० वर्षांपासून फसवणूक करीत आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात असे अनेक गुन्हे दाखल आहेत. नेहमी तो आपल्या वास्तव्याचे ठिकाण बदलतो. पोलिसांना सुगावा लागू नये, यासाठी तो फोनचाही वापर करीत नाही. तरीही, एका खब-याने दिलेल्या माहितीमुळे ठाणेनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याच्यावर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई - ठाण्यात बतावणी करून फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक :साडेचार लाखांचे सोने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 21:56 IST
मुंबई- ठाणे परिसरातील महिला तसेच जेष्ठ नागरिकांना बतावणी करीत त्यांच्याकडील दागिने लुबाडणाºया अरिफ शेख या भामटयाला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. वास्तव्याचा पत्ता बदलून मोबाईल न वापरता मुंबई आणि ठाण्यात त्याने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला असून गेल्या २० वर्षांपासून तो असे गुन्हे करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
मुंबई - ठाण्यात बतावणी करून फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक :साडेचार लाखांचे सोने हस्तगत
ठळक मुद्देठाणेनगर पोलिसांची कारवाई घाटकोपर येथील सराफाकडून केले सोने हस्तगत