खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला एक तपानंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 06:26 IST2019-04-18T06:26:41+5:302019-04-18T06:26:44+5:30

१२ वर्षांपूर्वी पसार झालेल्या राजकुमार राजावत (६२, रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्य प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ च्या पथकाने १५ एप्रिल रोजी अटक केली.

The absconding accused in the murder case was arrested one after the other | खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला एक तपानंतर अटक

खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला एक तपानंतर अटक

ठाणे : डोंबिवलीतील शैलेंद्रसिंह शेखावत (२७, रा. जयपूर, राजस्थान) याचा खून करून १२ वर्षांपूर्वी पसार झालेल्या राजकुमार राजावत (६२, रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्य प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ च्या पथकाने १५ एप्रिल रोजी अटक केली. मध्य प्रदेश विशेष कृती दलाच्या मदतीने चंबळ या अत्यंत संवेदनशील परिक्षेत्रातून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
शैलेंद्रसिंह काही पैशांच्या मोबदल्यामध्ये सुशिक्षित तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे काम करत होता. डोंबिवलीतील नरेंद्रसिंग राजावत (मूळ रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्य प्रदेश) आणि पिंटूसिंग राजावत (मूळ रा. मध्य प्रदेश) यांच्याकडूनही त्याने पैसे घेतले होते. परंतु, त्यांना त्याने नोकरीही लावली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याच कारणावरून नरेंद्रसिंग, पिंटूसिंग, राजकुमार आणि रिषी डॅग यांनी शैलेंद्रसिंह याचा डोंबिवलीमध्ये गळा आवळून खून केला होता. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह शालीमध्ये गुंडाळून तो नाल्यामध्ये फेकून पलायन केले होते. याप्रकरणी २१ मार्च २००७ रोजी विष्णुनगर पोलीसांत राजकुमारसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
फरार आरोपी राजकुमार हा मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील महेंदवा या त्याच्या मूळगावी असल्याची माहिती खबऱ्यांच्या मार्फत मिळाली. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींच्या पथकाने मध्य प्रदेशातील चंबळ खोºयात प्रत्यक्ष १५ दिवस मुक्काम करून सापळा लावला. स्थानिक भिंड जिल्ह्यातील असवाल पोलिसांसह एसटीएफचीही यावेळी मदत घेण्यात आली. अखेर, राजावतला १५ एप्रिल रोजी या पथकाने ताब्यात घेतले. राजावत याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या इतरही साथीदारांचा शोध सुरू आहे.
न्यायालयाचा जाहीरनामा
खुनानंतर सर्व आरोपी पसार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कलम २९९ नुसार १३ मे २००८ रोजी पुराव्यानिशी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. आरोपी पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे २ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध कलम ८७ प्रमाणे जाहीरनामा काढला होता. त्याच अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यातील फरारी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला सुरुवात केली.

Web Title: The absconding accused in the murder case was arrested one after the other