उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
By सदानंद नाईक | Updated: November 25, 2022 16:53 IST2022-11-25T16:53:20+5:302022-11-25T16:53:57+5:30
उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.

उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील हेरिटेज हाईटस इमारतींवरून काम करणाऱ्या राजू पांचाल नावाच्या मजुराचा पडून मृत्यू झाला. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
उल्हासनगरात मुंबईच्या धर्तीवर उंच इमारती उभ्या राहत असून कॅम्प नं-३ येथील हेरिटेज हाईटस नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरवारी सायंकाळी मजुरांचे काम करणाऱ्या राजू पांचाल याचा चौथ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. मृत नागरिकांच्या नातेवाईकांनी बांधकाम व्यवसायिकाकडे नुकसान भरपाई मागितल्याचे बोलले जाते. तर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याबाबत घटनेला २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही. एका माजी नगरसेवकांचे काम असल्याने, पोलीस गुन्हा दाखल केला जात नसल्याची चर्चा शहरात सुरू झाली. तर कामगारांच्या मृत्यू प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणे सर्वस्तरातून होत असून पोलीस भूमिकेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.